उल्हासनगर निरीक्षणगृहातील अधीक्षकांची हकालपट्टी करा - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:14 IST2025-01-12T06:13:26+5:302025-01-12T06:14:31+5:30
विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलावे, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

उल्हासनगर निरीक्षणगृहातील अधीक्षकांची हकालपट्टी करा - नीलम गोऱ्हे
मुंबई : उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत अधीक्षकांची हकालपट्टी करा, तसेच विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलावे, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
उल्हासनगर येथील मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून आठ मुली पळून गेल्या.
घटनास्थळी जाऊन याची माहिती घेतली असता मुलीसाठी चांगली स्वच्छतागृहे नाहीत. त्यांच्या जेवणाची आणि राहण्यासाठी योग्य सोय नाही. स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे निदर्शनास आले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सध्या कार्यरत अधीक्षक, कर्मचारी आणि सेवकांवर कारवाई करून त्यांना हटवावे.
राज्यातील विशेषगृह अधीक्षकाचे पद जाहिरात काढून ठरावीक काळासाठी भरावे. एकाच व्यक्तीची तीन वर्षांपेक्षा जास्त काळ नेमणूक न करता पदावरील व्यक्ती नामनिर्देशनाद्वारे बदलावेत, अशी विनंती गोऱ्हे यांनी केली.