उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:31 AM2019-09-25T03:31:13+5:302019-09-25T03:31:35+5:30
विधानसभा निवडणुकीसोबत सातार लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते.
सातारा : विधानसभा निवडणुकीसोबत सातार लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते. राजीनामा देण्याआधी विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेचीही पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट त्यांनी भाजपला घातली होती. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला, तेव्हा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने हा उदयनराजेंसाठी मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील खासदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मेळाव्याकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली होती. त्यामुळे उदयनराजे भोसले भाजपपासून दूर गेलेत का अशीही चर्चा सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
...तर मी अर्जच भरणार नाही - उदयनराजे
पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होताच उदयनराजे भावूक झाले. प्रतापसिंह महाराजांनंतर (डॅडींनंतर) जर मला कोणी खरं प्रेम दिलं असेल तर ते शरद पवार यांनी दिलं. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढवणार असतील तर त्यांच्या विरुद्ध मी अर्जही भरणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.
श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार उभा करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. या संदर्भात उद्या (बुधवारी) मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत आहे. या बैठकीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.