आवाजासह व्हिडीओ क्लीप काढा
By Admin | Published: February 28, 2017 05:01 AM2017-02-28T05:01:04+5:302017-02-28T05:01:04+5:30
वाहनांमध्ये असणारे कर्णकर्कश अनधिकृत हॉर्न आणि सायरनमुळे अन्य चालक तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो
मुंबई : वाहनांमध्ये असणारे कर्णकर्कश अनधिकृत हॉर्न आणि सायरनमुळे अन्य चालक तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परंतु याविरोधात तक्रार केल्यानंतरही पुराव्यांअभावी कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे अनधिकृत हॉर्न व सायरन वापरणाऱ्या वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिव (परिवहन)यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सायरनच्या वापराबाबत जनतेकडून आवाजासहित व्हिडीओक्लिपसह तक्रारी करण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. या तक्रारी प्राप्त होताच वाहनचालक अथवा मालकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. स्थानिक आरटीओ कार्यालयांमध्ये पत्राद्वारे किंवा ई-मेलद्वारे तक्रार करावी, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)