विदेशी कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढा
By admin | Published: June 13, 2017 02:26 AM2017-06-13T02:26:47+5:302017-06-13T02:26:47+5:30
देशावरील विदेशी कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशावरील विदेशी कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव व वित्त सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सुनील मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेतील माहितीनुसार, केंद्र शासनावर मोठ्या प्रमाणात विदेशी कर्ज आहे. मिश्रा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत देशावरील विदेशी कर्जाची माहिती मागितली होती. तसेच, याविषयी पंतप्रधान व वित्त सचिवांना वेळोवेळी निवेदने सादर केली होती. परंतु, त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली नाही. देशात २०१२ मध्ये दरडोई १४ हजार ६९९ रुपये विदेशी कर्ज होते. हे कर्ज आता वाढून दरडोई १८ हजारांच्या जवळपास पोहोचले आहे. याचिकाकर्त्याने स्वत:ला विदेशी कर्जमुक्त नागरिक घोषित करण्यात यावे आणि यापुढे केंद्र शासनाला विदेशी कर्ज घेण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे. येत्या काही दिवसांत यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे़ या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़