योजनांपासून अल्पसंख्याक राहिले दूर
By admin | Published: May 18, 2016 03:19 AM2016-05-18T03:19:38+5:302016-05-18T03:19:38+5:30
काँग्रेस सरकारने जनहितासाठी अनेक योजना मंजूर केल्या.
कल्याण : काँग्रेस सरकारने जनहितासाठी अनेक योजना मंजूर केल्या. परंतु त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस कार्यकर्ते व प्रशासन कमी पडले. त्यामुळे अल्पसंख्याकांना अशा योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकलेला नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व वित्त विभागाचे सदस्य प्रकाश मुथा यांनी रविवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘करिअर गाइडन्स व एज्युकेशन पॉलिसीज फॉर मायनॉरिटीज’ या विषयांवर जनजागृतीसाठी घेतलेल्या शिबिरात मार्गदर्शन करताना मुथा बोलत होते. यावेळी प्रदेश चिटणीस अलका आवळसकर, सदानंद तथा बाबा तिवारी, प्रशांत तोषणीवाल, सुनील खांडगे, अल्पसंख्याक विभागाचे कल्याण विभागाचे अध्यक्ष एजाज मौलवी, इफ्तेखार खान, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा लता जाधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजन व शैक्षणिक व्यवस्थेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच शैक्षणिक व्यवस्थेचे प्राचार्या श्रुती वायकर यांनी सादरीकरण केले.
काँग्रेस सरकारने शैक्षणिक प्रक्रिया सुधारण्यासाठी केलेल्या कायद्याची माहिती यावेळी मुथा यांनी दिली. सक्तीचे शिक्षण देऊन देशातून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यात काँग्रेसने योगदान दिले. अल्पसंख्याक म्हणजे मुस्लीम हा प्रचार खोटा आहे. अनेक समाजांचा अल्पसंख्याकांमध्ये अंतर्भाव आहे. शिक्षणाबाबत महिलांनाही साक्षर करून त्यांचा सामजिक स्तर उंचावला पाहिजे, हेच सूत्र काँग्रेसचे असल्याचे ते म्हणाले.
भिवंडी, मालेगाव सारख्या अल्पसंख्याकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शहरांत अल्पसंख्याक इंजिनिअरींग कॉलेज उघडण्यासाठी मोठे योगदान देण्याची भूमिका काँग्रेस सरकारने घेतली होती. मात्र, हा उपक्रम राबविण्यास अपयश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ टक्केआरक्षण, चार लाखांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज अशा योजनांचा वेध यावेळी मुथा यांनी घेतला. काँग्रेस कमिटीने घेतलेला हा उपक्रम शैक्षणिक मदतीसाठी आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)