रिंगण सोहळा ठरला आकर्षण
By admin | Published: June 15, 2017 08:25 PM2017-06-15T20:25:05+5:302017-06-15T20:25:05+5:30
नर्सी नामदेव येथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीनगरीत स्वागत मोठ्या उत्साहात केले
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 15 - तालुक्यातील नर्सी नामदेव येथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीनगरीत स्वागत मोठ्या उत्साहात केले. टाळ, मृदंगाच्या निनादात पालखी मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना मंगलमयी वातावरणाने परिसर भारला होता. तर पालखीचा रिंगण सोहळा हिंगोलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे काल प्रस्थान झाल्यानंतर आज १५ जून रोजी ही पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली. संत नामदेवांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या पालखीचे पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एकूण २२ टप्पे होतात. यातील पहिला टप्पा हा हिंगोली येथे आहे. हिंगोलीनगरीत दुपारी ३.४५ वाजता पालखी दाखल झाली होती. नागरिकांच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. विविध मान्यवरांनीही पालखीच्या स्वागतासाठी हजेरी लावत दर्शन घेतले. हाती भगवी पताका घेवून अगदी शिस्तीत जाणारे वारकरी, टाळ -मृदंगाचा गजर यामुळे भक्तीमय वातावरण झाले होते.
त्यानंतर रामलीला मैदानावर पालखी पोहोचली. तेथे वारकऱ्यांनी भजने गात सर्वांचीच मने जिंकली. तर रिंगणामध्ये मानाचा असलेला संत नामदेव महाराज यांचा अश्व धावल्यानंतर इतर अश्व धावले. तर घोडेस्वारांनी यावेळी विविध कवायती सादर केल्या. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या कवायती टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे सरसावले होते. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर,मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, अनिता सूर्यतळ, बिरजू यादव, गोपाल अग्रवाल, नाना नायक, दिनेश चौधरी, चांदु लांडगे, सभापती रामेश्वर शिंदे, जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी न.प. कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.
एकंदरीत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने हिंगोलीनगरी दुमदुमली होती. पालखीचे स्वागत करण्यासाठी विविध राजकारणी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी मंदिराचे बांधकाम सुरु असल्याने बांधकामासाठी मदत करण्याचेही आवाहनही या ठिकाणी केले जात होते. रिंगण सोहळा संपल्यानंतर हभप अच्यूत महाराज यांचे कीर्तन झाले.
पहिला टप्पा : २२ वर्षांची परंपरा कायम
संत नामदेव महाराज यांच्या पालखीची तब्बल २२ वर्षांची परंपरा असून, या पालखीत सहभागी झालेले वयोवृद्धही तरुणाला लाजवेल अशा कसरती सादर करीत होते. हिंगोलीत आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते रिंगण सोहळ्याचे ध्वजारोहण झाले. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी पत्नी निता यांच्यासह संत नामदेवांच्या पादुकांचे पूजन केले. त्यानंतर वारकऱ्यांचे रुमाल, टोपी व हार घालून स्वागत करण्यात आले. तर रिंगण सोहळा आटोपल्यानंतर त्यात सहभागी झालेल्या अश्वधारकांना पारितोषिक वितरणही करण्यात आले.
भाविक उपस्थित
पालखीचा हा आगळा-वेगळा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील वयोवृद्ध मंडळी दाखल झाली होती. पालखीतील वारकारी संप्रदायांची व येथे येणाऱ्या भाविकांची नागरिकांच्या वतीने व्यवस्था केली होती.