कल्याण फुल मार्केटचे नूतनीकरण चौकशीच्या फेऱ्यात
By Admin | Published: July 13, 2017 04:28 AM2017-07-13T04:28:31+5:302017-07-13T04:28:31+5:30
कल्याण बाजार समितीमधील फुल मार्केटची इमारत नव्याने उभारली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण बाजार समितीमधील फुल मार्केटची इमारत नव्याने उभारली जाणार आहे. या नव्या इमारतीच्या उभारणीसह गाळेवाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश खोत यांनी दिले आहेत. चौकशीअंती दोषी आढळल्यावर संबंधितांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले आहे.
बाजार समितीतर्फे फुल मार्केटचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या फुल मार्केटच्या नव्या इमारतीसाठी महापालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. या मार्केटमध्ये महापालिकेचे भाडेकरू असलेले फुलविक्रेते आणि बाजार समितीचे फुलविक्रेते अशा दोघांनाही गाळे दिले जाणार आहे. फुल मार्केट सुसज्ज होणार आहे. या गाळेवाटपात भ्रष्टाचार असल्याची तक्रार यापूर्वी अनेकांनी केली आहे. काही आमदारांनीही याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. मात्र, नव्या इमारतीच्या बांधकामाला काही फुलविक्रेत्यांचा विरोध आहे. याप्रकरणी फुलविक्रेत्यांनी कल्याण दिवाणी न्यायालयात व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या दोन्ही न्यायालयांत बाजार समितीच्या बाजूने निकाल लागला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली होती.
त्यानंतर पुन्हा काही मंडळींनी खोत यांची भेट घेऊन बाजार समिती बरखास्त करावी, समितीच्या संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ रद्द करावी, गाळेवाटपातील गैरव्यवहार थांबवावा, अशी मागण्या केल्या. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कल्याणमध्ये ‘आप’ पक्षाच्या प्रवक्त्या प्रति मेनन-शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहे. संचालक मंडळाच्या मुदतवाढीस खोत यांनी स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून समिती बरखास्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती ‘आप’ने दिली आहे. नव्या बांधकाम मंजुरीसह गाळेवाटपाला केडीएमसीही जबाबदार आहे. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यावर ‘आप’ने निशाणा साधला आहे.
>दोषींवर कारवाईचे आदेश : खोत : यासंदर्भात कृषी व पणन राज्यमंत्री खोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बाजार समितीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या सगळ्या प्रकारामुळे बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणारी फुल मार्केटची नवी वास्तू व गाळेवाटप प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
>‘आप’ची माहिती दिशाभूल करणारी : घोडविंदे
यासंदर्भात सभापती घोडविंदे म्हणाले, ‘आप’ने पत्रकार परिषदेत बाजार समितीविषयी दिलेली माहिती ही दिशाभूल करणारी आहे. बाजार समिती बरखास्त करण्याचे आदेशच राज्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत. बाजार समितीच्या विरोधात काही फुल मार्केटमधील व्यापारी कल्याण दिवाणी व उच्च न्यायालयात गेले होते. त्यांच्या बाजूने निकाल लागलेला नसल्याने त्यांनी आता ‘आप’ पक्षाला हाताशी धरून बाजार समितीला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे.