भाडेकरारावरील भूखंडांचे नूतनीकरण
By admin | Published: June 7, 2017 05:20 AM2017-06-07T05:20:29+5:302017-06-07T05:20:29+5:30
खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांसाठी पालिकेने नवे धोरण तयार केले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांसाठी पालिकेने नवे धोरण तयार केले आहे. त्यानुसार या भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण केले जाईल. मात्र या धोरणातून महालक्ष्मी रेसकोर्स व वेलिंग्टन क्लबसारख्या मोठ्या भूखंडांना वगळले आहे. शिवसेनेचे महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बनविण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे हे धोरण शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळले होते. त्यानुसार यात सुधारणा करीत प्रशासनाने नवीन प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर आणला आहे.
सन १९३३ मध्ये मुंबई शहर विश्वस्त मुंबई पालिकेत विलीन झाले. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीतील चार हजार १७७ भूखंडांची मालकी पालिकेकडे आली. हे सर्वच भूखंड दहा ते ९९ वर्षे व कायमस्वरूपी भाडेकरारावर देण्यात आले आहेत. यापैकी २३७ भूखंडांचे भाडेकरार संपले आहे. भाडेकरारावरील भूखंडांच्या नूतनीकरणासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाच्यावतीने धोरण निश्चित करण्यात आले आहे.
या नियमावलीला भाजपाचे अध्यक्ष असलेल्या सुधार समितीनेही हिरवा कंदील दाखवून शिवसेनेची गोची केली. मात्र या धोरणामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची देखभाल करणाऱ्या मे. वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब या संस्थेलाही नूतनीकरणाची संधी मिळेल. याचा फटका शिवसेनेच्या थीम पार्कच्या प्रस्तावाला बसेल. भाजपाचा हा डाव ओळखून शिवसेनेने महासभेत हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता. सुधारित प्रस्तावानुसार मोठ्या भूखंडांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
>अनेक मालमत्ता मोडकळीस
भाडेकरार संपुष्टात आलेल्या भूभागावरील अनेक इमारती उपकरप्राप्त असून त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा मालमत्तांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. असे २४२ भूखंड आहेत, त्यांचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यांचे नुतनीकरण केल्यास भुईभाड्याद्वारे महापालिकेला महसूल प्राप्त होईल. तसेच ज्यांनी अटीभंग केला आहे, त्यांच्याकडून दंड वसूल
केला जाईल. तीन वर्षांत त्यांनी अटी आणि शर्तींचे पालन केल्यास ते भूखंड पालिकेच्या ताब्यात जातील. तसेच रखडलेला पुनर्विकासही मार्गी लागेल आणि भाडेकरूंचे नवीन इमारतीत पुनर्वसन शक्य होईल.