भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण
By admin | Published: June 8, 2017 06:20 AM2017-06-08T06:20:32+5:302017-06-08T06:20:32+5:30
खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या भाडकेकरार नूतनीकरणाच्या नवीन धोरणानुसार महानगरपालिकेला जास्त महसूल मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या भाडकेकरार नूतनीकरणाच्या नवीन धोरणानुसार महानगरपालिकेला जास्त महसूल मिळणार आहे. या धोरणातून महालक्ष्मी रेसकोर्ससह वेलिंग्टन क्लब अशा मोठ्या भूखंडांना वगळले आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी भाडेतत्त्वावरील १२४७ भूखंड व ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर असलेले २१४८ भूखंडांचे भाडेकरार ३० वर्षांचे होणार आहेत.
मुंबई शहर सुधार विश्वस्त सन १९३३ मध्ये महापालिकेत विलीन झाल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अखत्यारित येत असलेले सर्व भूखंड हे महापालिकेच्या ताब्यात आले. ४ हजार १७७ भूखंड हे कायमस्वरुपी, ९९ वर्षे ते दहा वर्षे या कालावधीसाठी भाडेकरारावर दिलेले आहेत. यातील २४२ भूखंडांचे भाडेकरार संपुष्टात आलेले असून त्यांचे नूतनीकरण झालेले नाही. महापालिकेने ४ हजार १७७ भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या नूतनीकरणासंदर्भातील धोरणाचे सुधार समितीच्या बैठकीत सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर या धोरणाला मंजुरी देण्यात आली.
नव्या धोरणानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ज्या भूखंडांवर २५ टक्क्यांहून कमी बांधकाम आहेत; अशा व मनोरंजन, खेळाच्या मैदानासाठीच्या राखीव भूखंडांचा भाडेकरार वाढवण्यात येणार नाही. यामुळे असे भूखंड पालिकेकडेच राहणार आहेत. भाडेकरारात कोणतेही बदल झाल्यास असे बदल पालिकेच्या निदर्शनास आल्यावर या भूखंडांचे जुने करार रद्द होऊन त्याचे रूपांतर ३० वर्षांसाठी केले जाणार आहे.
>पुनर्बांधणी करणे शक्य
४१७७ पैकी २४२ भूखंडांचे भाडेकरार या नव्या धोरणानुसार केले जाणार आहेत. तसेच अनेक भूखंडांवरील इमारती जीर्ण झाल्याने त्याची पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. जुन्या धोरणानुसार एका चौरस मीटरला एक रुपया भाडे पालिकेला मिळत होते. आता भाडेकरारात कोणताही बदल झाल्यास महापालिकेला रेडीरेकनरनुसार एक टक्का भाडे मिळणार आहे. यामुळे पालिकेचा महसूल वाढणार आहे.