ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 08:13 PM2021-10-02T20:13:43+5:302021-10-02T20:21:21+5:30
d m mirasdar : मराठी साहित्य विश्वातले विनोदी शैलीमध्ये लिहिणारे लेखक आणि कथाकथनकार अशी द. मा. मिरासदार यांची ओळख होती.
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार (d m mirasdar) यांचे आज निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. मराठी साहित्य विश्वातले विनोदी शैलीमध्ये लिहिणारे लेखक आणि कथाकथनकार ही त्यांची ओळख होती.
द. मा. मिरासदार यांना दादासाहेब असे म्हटले जात होते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी १४ एप्रिल १९२७ मध्ये झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूरमधे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
ना.सी. फडके संपादन करत असलेल्या साप्ताहिक झंकारमध्ये ते लेखनही करत होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची परंपरा द. मा. मिरासदार यांनी आणखी पुढे नेली. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती.
द. मा. मिरासदार यांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.
मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार द. मा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.