रिक्षाचे भाडे अॅपद्वारे भरा
By Admin | Published: November 19, 2016 02:40 AM2016-11-19T02:40:22+5:302016-11-19T02:40:22+5:30
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे.
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे. मात्र यावर तोडगा म्हणून उपनगरातील एका रिक्षाचालकाने ‘मोबाईल अॅप’द्वारे रिक्षाचे भाडे स्वीकारण्याची शक्कल लढवली आहे.
विजयकुमार सिंग असे या रिक्षाचालकाचे नाव असून, चांदिवली येथील गांधीनगरमध्ये मागील तीन वर्षांपासून पत्नी आणि तीन मुलांसोबत तो राहतो. महत्त्वाचे म्हणजे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद होण्यापूर्वीच त्याने रिक्षाभाडे आॅनलाईन घेण्यास सुरुवात केली होती. परिणामी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका त्याला बसला नाही.
वांद्रे ते दहिसर, सायन ते मुलुंड आणि मीराभाईंदर रोड परिसरात तो रिक्षा चालवतो. अनेकदा त्याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांना ‘मोबाईल अॅपद्वारे’ पैसे देण्याची विनंती तो करतो. मुख्य म्हणजे मोठया कंपनीत काम करणाऱ्या आणि महागडे फोन वापरणाऱ्या लोकांनाही आॅनलाईन पेमेंटचे आॅप्शन माहित नसल्याचे त्याला आढळले. त्यानुसार अनेकांना त्याने ते कसे वापरायचे? हे देखील शिकवले आहे.
दरम्यान, आॅनलाईन पेमेंट करण्यास अनेक जण सहसा धजावत नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे. तरिही पाच रिक्षा चालकांना त्याने आॅनलाईन पेमेंट घेण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
>पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद होण्यापूर्वीच विजयकुमार सिंग याने रिक्षाभाडे आॅनलाईन घेण्यास सुरुवात केली होती. परिणामी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका त्याला बसला नाही.