उत्पन्न वाढीसाठी बस आगार भाड्याने

By Admin | Published: June 9, 2017 02:19 AM2017-06-09T02:19:15+5:302017-06-09T02:19:15+5:30

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी भाडेवाढ करण्याचा मार्ग सोपा नाही. कर्मचारी व त्यांच्या सवलतींमध्ये कपातीलाही विरोध होत आहे.

Rent a bus for income generation | उत्पन्न वाढीसाठी बस आगार भाड्याने

उत्पन्न वाढीसाठी बस आगार भाड्याने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी भाडेवाढ करण्याचा मार्ग सोपा नाही. कर्मचारी व त्यांच्या सवलतींमध्ये कपातीलाही विरोध होत आहे. त्यामुळे बेस्ट बचाव हा कृती आराखडा लवकर मंजूर होण्याची चिन्हे नसल्याने बेस्ट प्रशासनाने बस आगारांची जागाच भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला प्रयोग शिवाजी नगर येथील बस आगारापासून होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला.
बेस्ट उपक्रमाने १९८१मध्ये देवनार, शिवाजी नगर गावठाण येथील ७९९८६.९० चौरस मीटर जागा महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतली. यापैकी २६०२९.५० चौरस मीटर जागेवर बस आगार, ३२७६ चौरस मीटर जागेवर बस स्थानक, २४६५१.८५ चौरस मीटर जागेवर सेवकवर्ग वसाहतीचे बांधकाम केले आहे. इतर अंदाजित २६०२९.५० चौरस मीटर जागा बेस्टने अंशत: विकसित केली असून, सध्या ही जागा विनावापर पडून आहे. ही जागा शिवाजी नगर ते घाटकोपर जंक्शनचा पूल बांधणाऱ्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे.
बैंगन वाडीपासून देवनार डम्पिंग जंक्शन, शिवाजी नगर जंक्शन ते घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
प्रस्तावित पुलाच्या कामासाठी हे काम करणाऱ्या कंपनीने कास्टिंग यार्डसाठी बस आगाराची वापरात नसलेली जागा भाडेतत्त्वावर मागितली. ही जागा घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गातून जाणाऱ्या संपर्क रस्त्याच्या आवश्कतेकरिता रिक्त ठेवण्यात आली आहे.
>बेस्टला ४ कोटींहून अधिक महसूल
बेस्ट समितीपुढे सादर झालेल्या प्रस्तावानुसार मेसर्स जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) लिमिटेड यांना १०११७ चौरस मीटर जागा १३९ रुपये प्रति चौरस मीटर प्रति महिना याप्रमाणे ३० महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. यामधून बेस्टला मासिक १४ लाख ६ हजार २६३ रुपये भाड्याप्रमाणे ३० महिन्यांत ४ कोटी २१ लाख ८७ हजार ८९० रुपये इतके भाडे तसेच ८४ लाख ३७ हजार ५७८ रुपये इतकी सुरक्षा ठेव म्हणून बेस्टला मिळणार आहे.

Web Title: Rent a bus for income generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.