महापालिका भाड्याने देणे!
By admin | Published: August 30, 2016 01:40 AM2016-08-30T01:40:40+5:302016-08-30T01:40:40+5:30
शैक्षणिक संस्थेला महापालिकेची जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध केला.
पिंपरी : शैक्षणिक संस्थेला महापालिकेची जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध केला. ‘महापालिका भाड्याने देणे आहे. महापालिकेच्या सर्व मिळकती भाड्याने देणे आहे,’ असे फलक सभागृहात फडकविले. या विषयावर बोलू न दिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी सभात्याग केला.
चिखली परिसरातील माध्यमिक शाळेसाठी अठरा हजार चौरस मीटर जागेचे आरक्षण आहे. यापैकी ४७५४ चौरस मीटर क्षेत्र हे महापालिकेने टीडीआरच्या बदल्यात ताब्यात घेतले आहे. उर्वरित क्षेत्राचा ताबा एका संस्थेकडे आहे. तर ४७५४ चौरस मीटर हे क्षेत्र महापालिकेने माध्यमिक शाळेसाठी आरक्षित केले आहे. ही जागा तीस वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, मनसेचे राहुल जाधव, अपक्षाचे गटनेते सुरेश म्हेत्रे यांनी जोरदार विरोध केला. ‘महापालिका भाड्याने देणे आहे. महापालिकेच्या सर्व मिळकती भाड्याने देणे आहे’ असे फलक सभागृहात फडकावले.
या वेळी योगेश बहल म्हणाले, ‘‘संबंधित विषय हे आयुक्तांचे डॉकेट आहे. उगाच आरडाओरडा होत आहे. विषयाबद्दल प्रशासनास म्हणणे मांडू द्यात. खुलासा करू द्यावा.’’ त्या वेळी आम्हाला बोलू द्या, अशी मागणी ग्रामीण भागातील नगरसेवकांनी केली. त्यावर महापौरांनी प्रवीण आष्टीकर यांनी खुलासा करण्यास सांगितले.
आष्टीकर म्हणाले, ‘‘संबंधित विषयासाठी निविदाही मागविल्या. २ कोटी ५१ लाख ४८ हजार ६६० रुपयांच्या तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी सुभद्राज एज्युकेशनल सोसायटी यांचीच निविदा पात्र ठरली. तसेच त्यांनी ०.५० टक्के अशी २ कोटी ५२ लाख असा जास्त दर सादर केला. त्यामुळे संबंधित संस्थेला जागा दिली आहे.’’ त्यावर महापौरांनी हा विषय तहकूब ठेवला आहे, असे सांगितले. त्यावर साने, जाधव, म्हेत्रे यांच्यासह सीमा सावळे, आशा शेंडगेंनी चर्चेची मागणी केली.
या वेळी महापौर व बहल यांच्यात काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावर चिडून महापौर म्हणाल्या, ‘मलाही काही अधिकार आहेत ना? विषय तहकूब ठेवला आहे. आता चर्चा नाही.’’ त्यानंतर हा विषय तहकूब केला आहे. त्यावर चर्चा करून सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये,
असे महापौर म्हणाल्या. चर्चेची मागणी फेटाळली. त्यावर चिडलेल्या साने व जाधव यांनी निषेध करत सभात्याग केला.