गाळेधारकांनी थकविले लाखोंचे भाडे
By admin | Published: July 11, 2017 01:04 AM2017-07-11T01:04:18+5:302017-07-11T01:04:18+5:30
मंडईतील तब्बल ६३५ गाळेधारकांकडे तब्बल १६ लाख रुपयांहून अधिक भाडे थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मंडईतील तब्बल ६३५ गाळेधारकांकडे तब्बल १६ लाख रुपयांहून अधिक भाडे थकबाकी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच ४९ रुपयांच्या भाड्याचा भरणादेखील अनेकांनी केलेला नाही.
महापालिकेच्या वतीने महात्मा फुले मंडई परिसरात तब्बल १ हजार २१५ लोकांना गाळ्यांचे वितरण करण्यात अले आहे. यात महात्मा फुले जुनी मंडई, नवीन मंडई, ऊसविभाग, मिनी मार्केट, कमर्शिअल इमारत, मडकेआळी, मसालेवाले डेली पास आणि तंबाखू आळीचा समावेश आहे. यातील ६३५ गाळेधारकांनी वर्षानुवर्षे भाड्याचे पैसेच भरलेले नाहीत. या गाळेधारकांकडून ४९ ते १ हजार ७४० रुपयांचे मासिक भाडे आकारण्यात येते. शहर मध्यवस्तीतील व्यावसायिक दृष्ट्या हा भाग अत्यंत मोक्याचा समजला जातो. या ठिकाणी इतके अल्पभाडे असूनही, बहुतांश गाळेधारकांचा कल भाडे थकविण्यावरच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
जुन्या मंडईतील २७४ गाळेधारकांकडे २१ जून १७ अखेरीस ६ लाख ४ हजार ५२८ आणि नवीन मंडईतील ३१९ गाळेधारकांकडे ७ लाख २९ हजार १७७ रुपयांची थकबाकी होती. ऊस विभागातील १२ गाळेधारकांकडे ४६ हजार २३६, मिनी मार्केटमध्ये दोघांकडे ४०८, मडके आळीतील ११ गाळेधारकांकडे २६ हजार ८५० रुपयांची थकबाकी आहे.
मसालेवाले डेली पास दिलेल्या ६ व्यावसायिकांकडे १ लाख ४ हजार २७० आणि तंबाखू आळीतील ११ गाळेधारकांकडे ९५ हजार ९३७ रुपयांची भाडे थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. अशी एकूण ६३५ गाळेधारकांकडे १६ लाख ७ हजार ४०६ रुपयांची रक्कम भाड्यापोटी थकीत असल्याचे माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी उघड केले आहे.
मंडईला ‘बाहेरच्यां’चा विळखा
गाळेधारकांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही, अनेक व्यवसायिक रस्त्याच्या कडेला, फुटपाथ अथवा गाळ्याबाहेर दुकान थाटत असतात. अशा व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतरही या बाहेरच्यांचा त्रास काही कमी झालेला नाही. पालिकेने २०१४ साली ६५, २०१३मध्ये १२०, २०१४ मध्ये ८२, २०१५ मध्ये ६७, २०१६ मध्ये ४० आणि २०१७ मध्ये आत्तापर्यंत २५ वेळा कारवाई केली आहे.