रेणुकामाता विद्यालयास ४ लाख दंड
By admin | Published: January 20, 2017 04:53 AM2017-01-20T04:53:02+5:302017-01-20T04:53:02+5:30
श्री. रेणुकामाता विद्यालयाच्या इमारतीच्या बेकायदा बांधकामास तहसीलदारांनी ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टमार्फत मोहटे गावामध्ये चालवण्यात येणाऱ्या श्री. रेणुकामाता विद्यालयाच्या इमारतीच्या बेकायदा बांधकामास तहसीलदारांनी ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़
मोहटे गावामध्ये जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्टमार्फत रेणुकामाता विद्यालय व वसतिगृह चालविण्यात येते. या विद्यालयाची इमारत गट नं २७२ वर बांधलेली असून, याच इमारतीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी, तसेच बारावीपर्यंत कला व विज्ञान शाखेतील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना नियोजन कलम ५२ व ५३ अन्वये बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे़ हे बेकायदा बांधकाम पाडणे व गट नं २७२ मधील ३०० चौमी क्षेत्रावर विनापरवाना बांधकाम केल्याबद्द तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी हा दंड ठोठावला.दंड न भरल्यास सक्तीने वसुली केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. जगदंबादेवी ट्रस्टकडून रेणुकामाता विद्यालय चालवण्यात येते. ट्रस्टवर असलेले विश्वस्त विद्यालयाचा संपूर्ण कारभार पाहतात़ परंतु विद्यालायाच्या इमारत बांधकामापासून ते आजतागायत बांधकाम परवानाच घेतला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ (प्रतिनिधी)