माहीम रस्त्याची डागडुजी होणार
By admin | Published: May 21, 2016 04:12 AM2016-05-21T04:12:08+5:302016-05-21T04:12:08+5:30
पालघर ते माहीम रोड या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.डी. जाधव यांनी दिली
पालघर : पालघर ते माहीम रोड या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.डी. जाधव यांनी दिली. तर या रस्त्याच्या नूतनीकरणाची बारगळलेली निविदा पावसाळ्यानंतर नव्याने पुन्हा विचारार्थ घेतली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी आमदार विलास तरे यांना दिली.
या रस्त्याच्या निर्मितीसाठी ५ कोटी ७५ लाखांची निविदा नामंजूर करण्यात आल्यानंतर खड्डे व धुळीने भरलेल्या या रस्त्याच्या उभारणीचे काम ठप्प पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज बविआचे आमदार विलास तरे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली.
या वेळी झालेल्या बैठकीदरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले, माहीमच्या रस्त्याची निविदा नामंजूर करण्यात आली असली तरी पुन्हा आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान नव्याने निविदा काढून रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. मात्र जनतेच्या सोयीसाठी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. डी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालघर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पालघर रेल्वे स्टेशन ते माहीम रोड या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाच्या ५ कोटी ७५ हजार खर्चाच्या निविदेला सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षानेही बेकायदेशीर काम असल्याचा ठपका ठेवून ती निविदा रद्द करायला भाग पाडली होती.
त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने व हा रस्ता धुळीने पूर्ण भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे असल्याने बोईसरचे बविआचे आमदार विलास तरे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील इत्यादींनी मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली.
त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लागल्याने आचारसंहितेच्या कचाट्यात ती सापडून रस्त्याचे काम ठप्प पडले होते. पालघर स्टेशनमधून सर्वात जास्त रहदारीचा म्हणून माहीमचा रस्ता ओळखला जात असून दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात.