कर्ज फेडा किंवा बायकोला पाठवा - परभणीच्या पंचाची धक्कादायक मागणी
By Admin | Published: January 19, 2016 03:13 PM2016-01-19T15:13:49+5:302016-01-19T15:35:18+5:30
'कर्ज फेडा नाहीतर बायको पाठवा' अशी धक्कादायक मागणी परभणीतील गोंधळी समाजाच्या पंचाने नाशिकच्या दांपत्याकडे केली आहे.
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १९ - पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा जाच कायम असून त्याचे जिवंत उदाहरण परभणीतील घटनेच्या रुपाने समोर आले आहे. परभणीतील गोंधळी समाजाच्या पंचाने नाशिकच्या दांपत्याकडे ' कर्ज फेडा नाहीतर बायको पाठवा' अशी धक्कादायक मागणी केल्याचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे. नाशिकच्या मोरे दांपत्याने याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
मोरे दांपत्याने परभणीतील पंचाकडून काही पैसे कर्जाच्या स्वरूपात घेतले होते. मात्र ते परत करण्यास वेळ लागत असल्याने पंचानी त्यांच्यांकडे पैशाचा तगादा लावला. तसेच पैसे फेडता येत नसतील तर तुमच्या बायकोला आमच्याकडे पाठवा, असा अजब आदेश जातपंचायतीने दिल्याचे वृत्त आहे. आजच्या २१ व्या शतकातही जातपंचायतीचा समाजावरील पगडा आणि त्यांच्याकडून होणार छळ कायम असल्याचे चित्र यामुळे स्पष्ट होत आहे.