अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची होणार पुनरावृत्ती ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 03:03 PM2019-08-24T15:03:30+5:302019-08-24T15:10:26+5:30
अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर यांची लढत १९७८ पुनरावृत्ती समजली जात आहे.
मुंबई - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भोकरमध्ये पुन्हा १९७८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यावेळी भोकरमधून शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात थेट लढाई झाली होती. तर आगामी विधानसभेत या दोन्ही नेत्यांच्या मुलांमध्ये ही लढाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोकर मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती होणार का अशी चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी सुद्धा याचे संकेत दिले आहे.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढाई झाली होती. त्यावेळी शंकरराव चव्हाण हे विजयी झाले होते. तर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बाबासाहेब गोरठेकर यांचे पुत्र माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आहे. तर भाजपकडून त्यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यातच आता अशोक चव्हाण हे त्यांच्या पारंपारिक भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर यांची लढत १९७८ पुनरावृत्ती समजली जात आहे.
भोकर येथील एका कार्यक्रमात बोलताना, अशोक चव्हाण यांनी यावेळी १९७८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून मतदार माझ्या बाजूने उभे राहतील, असे वक्तव्य केले आहेत. त्यामुळे ते भोकरमधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत गोरठेकर यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका सुद्धा केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातील लढाई चर्चेचा विषय ठरणार आहे.