महाराष्ट्राच्या भाग्यासाठी सरकार बदला

By admin | Published: October 13, 2014 11:16 PM2014-10-13T23:16:12+5:302014-10-13T23:36:06+5:30

कासार्डेतील सभेत नरेंद्र मोदींचे आवाहन : काँग्रेस, राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर टीका

Replace the government for the fate of Maharashtra | महाराष्ट्राच्या भाग्यासाठी सरकार बदला

महाराष्ट्राच्या भाग्यासाठी सरकार बदला

Next

कणकवली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली जहागिरी राजकारणाच्या माध्यमातून उभी केली आहे. बाप मंत्री, तर मुलगा सुपरमंत्री ही लोकशाही नाही. ही माणसे सत्तेत येतात तेव्हा आपल्या मुलांना सत्ता वाटतात. या घराणेशाहीपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे. लोकशाहीत सामान्यांची उन्नती व्हायला हवी. महाराष्ट्राचे भाग्य बदलायचे असेल तर सरकार बदलावे लागेल, त्यासाठी पूर्ण बहुमताचे भाजप सरकार बनवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासार्डे (ता. कणकवली) येथील जाहीर सभेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची सांगता सभा कासार्डे येथील माळरानावर आज, सोमवारी दुपारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कणकवलीतील भाजपचे उमेदवार आमदार प्रमोद जठार, कुडाळमधील उमेदवार विष्णू मोंडकर, सावंतवाडीतील राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, गोव्याचे आमदार विष्णू वाघ, प्रमोद रावराणे, काका कुडाळकर, राजू राऊळ, आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिल्याने हा भाग्यवान जिल्हा आहे. मात्र, देवाने दिले आणि सरकारने लुटले म्हणून सिंधुदुर्गची उन्नती खुंटली. ‘इको टुरिझम’साठी सिंंधुदुर्गसारखी सुंदर जागा नाही. मात्र, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन सुंदर नाही, म्हणून परिस्थिती सुधारली नाही. (प्रतिनिधी)

चतुरंगी क्रांती
पंतप्रधान मोदी यांनी चतुरंगी क्रांतीचा नारा दिला. राष्ट्रीय ध्वजातील हिरवा, भगवा आणि पांढरा यासह चौथा अशोकचक्राचा निळा रंग आहे. निळा रंग म्हणजे सामुद्रिक संपदा आहे. मत्स्योद्योग, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन, समुद्रातील गॅस, तेल भांडार, आदी माध्यमातून निळी क्रांती, दुसरी हरितक्रांती, दुग्धोत्पादनाची धवलक्रांती आणि भगव्या रंगाची म्हणजे ऊर्जेची क्रांती, अशा चतुरंगी क्रांतीचा उल्लेख मोदी यांनी केला.



महाराष्ट्र प्रचार दौरा सफल झाला
देवगड तालुक्यातील उंडील येथील अनंत काळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असताना आपले शिक्षक होते. दिवाळीच्या कालावधीत ३५ वर्षांपूर्वी उंडील येथे मी राहून गेलो आहे. अनंत काळे यांच्या बहिणीने आज आशीर्वाद देऊन आपला महाराष्ट्र प्रचार दौरा सफल केला आहे.

काजू टरफलांचा रस बनविण्यासाठी प्रयत्न
सिंधुदुर्गात काजूची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या काजूची टरफले फेकून देऊ नका. त्यामध्ये उच्चप्रतीची पोषकतत्त्वे असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. भविष्यात काजूगरातून जेवढे उत्पन्न मिळते, तेवढेच या टरफलातून मिळणार आहे. या टरफलांचा रस बनवला जाईल. लवकरच या संशोधनातून यश मिळेल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

भाषणातील प्रमुख मुद्दे
सिंधुदुर्गचे निसर्गसौंदर्य गोव्यापेक्षा चांगले, परंतु सरकारच्या अनास्थेने सिंधुदुर्गवासीयांची उन्नती खुंटली.
राज्यातील फक्त किल्ल्यांचे पर्यटन सुधारले तरी अर्थकारणात लक्षणीय फरक पडेल.
शीतपेयांमध्ये फळांच्या रसाचा समावेश झाल्यास फळबागायतदारांना सोन्याचे दिवस.
कृषिमालात मूल्यवृद्धीची गरज असून, केंद्र सरकारचे ते उद्दिष्ट आहे.
पंतप्रधानांनी हरितक्रांती, दुग्धक्रांती, ऊर्जेची भगवी क्रांती आणि सामुद्रिक निळी क्रांती, अशा चतुरंगी क्रांतीचा नारा दिला.

शेतमालाच्या मूल्यवृद्धीसाठी प्रयत्न
निर्यात होणारा हापूस आंबा विदेशातून मागे येऊ लागला. त्यामुळे सरकारची अब्रू वेशीला टांगली आणि शेतकरी हतबल झाला, परंतु आता दिल्लीत असे सरकार आहे, जे शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देईल. कृषिमालात मूल्यवृद्धीची आवश्यकता आहे, तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो. टोमॅटो विकण्यापेक्षा त्याच्यापासून केचप करून विकले तर जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतमालात मूल्यवृद्धी करून शेतकऱ्यांना पैसा मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. शीतपेयांमध्ये पाच टक्के फळांचा रस मिळवू शकतो का? यासाठी शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांशी आमची बोलणी सुरू आहे. तसे झाल्यास फळबागायतदारांच्या मालाला बाजारपेठेची चिंता राहणार नाही. कंपन्या शेतकऱ्यांच्या दारात उभ्या राहतील. आम्हाला ग्रामीण अर्थकारण बदलायचे आहे. रोजगार, कृषी आधारित व्यवसाय, इको टुरिझम, मत्स्योद्योग, आदींमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणल्यास हा बदल घडेल. आमचे मासे जपानपर्यंत जातात, परंतु येथील मच्छिमाराला सुविधा मिळत नाहीत.

पर्यटनातून समृद्धी
पर्यटन हा सर्वांत वेगाने विकसित होणारा उद्योग आहे. कमी गुंंतवणुकीत रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. गरीबही या क्षेत्रात पैसा कमावू शकतो. चणे, बिस्कीट, चहा विकणाराही या क्षेत्रात कमावतो, परंतु पर्यटनाकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले. समुद्रकिनारा आणि किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी मोठी विरासत मागे ठेवली आहे. युरोपमध्ये जुन्या किल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. थोड्याशा प्रयत्नांनी किल्ल्यांच्या पर्यटनात वृद्धी होऊ शकते.

Web Title: Replace the government for the fate of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.