बदल्यांच्या रॅकेटची पाळेमुळे खोलवर
By admin | Published: June 3, 2017 04:58 AM2017-06-03T04:58:30+5:302017-06-03T04:58:30+5:30
आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार आणि महानंदचा
यदु जोशी/मनीषा म्हात्रे / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार आणि महानंदचा सरव्यवस्थापक (वित्त व लेखा) विद्यासागर हिरमुखे आणि त्याचा साथीदार किशोर माळी यांचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे. या दोघांसह अटक केलेले विशाल उंबळे आणि रवींद्रसिंह यादव या चौघांच्या रॅकेटने उत्पादन शुल्क आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी मोठी रक्कम उकळल्याचे सांगण्यात येते. या रॅकेटची पाळेमुळे खोल असल्याचे चौकशीतून समोर येत आहे.
हिरमुखे, माळी, नवी दिल्लीचा वीरेंद्रसिंग यादव आणि पुण्याचा विशाल ओंबळे यांना बुधवारी रात्री मुंबई विमानतळानजीकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने अटक केली होती. या चौघांकडून धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे समजते. फसवणूक झालेले बरेच अधिकारी उगाच कटकट नको, म्हणून तक्रार करण्यास टाळाटाळ करीत असले, तरी या चौघांच्या चौकशीमध्ये त्यांनी कोणाकडून किती पैसा घेतला, याची माहिती समोर येऊ शकते. सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांची मुंबईला बदली करून देतो, म्हणून या रॅकेटने पैशांची मागणी केली होती. चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. चारही आरोपींना न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींपैकी रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा बारावी नापास असून, तो दिल्लीतील साकेत भागातील रहिवासी आहे. तो स्वत:ला केंद्रीय सल्लागार असल्याचे भासवतो. त्याची दिल्लीत कन्स्लटन्सी फर्म आहे. आयएस, आयपीएस बदल्यांबरोबर जमिनीचे व्यवहार, शासकीय कामांमध्ये पैसे घेऊन तो काम करतो. पुण्याच्या विशाल उंबळेविरुद्ध पुण्यात दोन खंडणी आणि दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गृहविभागाचा अधिकारी असल्याचे भासवून तो पैसे उकळत होता. बोरीवलीतील आरटीआय चॅरिटेबल ट्रस्टशी या रॅकेटने आर्थिक व्यवहार केल्याची माहिती आहे.
ती पोलीस प्रशिक्षण संस्थाही चौकशीच्या घेऱ्यात
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सिद्धराम शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण संस्था चालविली जाते. या संस्थेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतल्यास, नोकरीची शाश्वती दिली जात होती. उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांची पोलिसात भरती करण्याचे प्रकार घडले काय, याची चौकशीही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यासागर हिरमुखेचा या प्रशिक्षण संस्थेशी काय संबंध होता, याचीही चौकशी होऊ शकते.
हा किशोर माळी कोण?
रॅकेटमधील एक असलेला किशोर माळी हा सोलापूरचा रहिवासी आहे. तो बालाजी सरोवर इंटरनॅशनल आणि हॉटेल त्रिपुरी सुंदरी या सोलापुरातील आलिशान हॉटेलांमध्ये अनेक दिवस मुक्कामी राहिला. या काळातले बिल थकवल्याने दोन्ही हॉटेलांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केल्याचे समजते. माळी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. नंतर तो विद्यमान मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात गेला. सोलापुरात त्याने जानकरांच्या उपस्थितीत मेळावादेखील घेतला होता.