पाच अधिकाऱ्यांची बदली
By admin | Published: October 4, 2015 02:37 AM2015-10-04T02:37:59+5:302015-10-04T02:37:59+5:30
राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली. श्यामलाल गोयल हे सामान्य प्रशासन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय
मुंबई : राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली. श्यामलाल गोयल हे सामान्य प्रशासन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांची बदली एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या पुणे मुख्यालयात आयुक्त असलेले रणजीतसिंग देओल राज्य परिवहन महामंडळाचे नवे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.
मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील हे आता महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे (एमएडीसी) नवे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.
याशिवाय, अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सर्व्हेअर ए.पी. विधळे यांची बदली सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. सांगलीमध्ये या पदावर आतापर्यंत असलेले एस.एम. लोखंडे यांची बदली वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई. रायते यांची बदली उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तर एम.जी. अर्दाड हे हिंगोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)