राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही, प्रदेश काँग्रेसची रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:28 AM2017-09-18T05:28:32+5:302017-09-18T05:28:34+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनिती प्रदेश काँग्रेसने ठरविली आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्देशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
अनंत जाधव
सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनिती प्रदेशा काँग्रेसने ठरविली आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्देशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने प्रदेश काँग्रेसने शनिवारी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून राणेंना धक्का दिला आहे. या निर्णयानंतर राणे यांनी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत हे आहेत. मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनीती काँग्रेसच्यावतीने आखली आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टीकेला उत्तर देत नसून त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे. राणेंच्या आरोपांना उत्तर दिले नाही, तर त्यांच्या आरोपातील हवा निघून जाईल तसेच राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, असेही यातून दिसून येईल, अशी यामागची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत.
>पक्ष मोठा करणे हे धोरण : अशोक चव्हाण
राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षावर टीका केली तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
>राणे आज सिंधुदुर्गात; कुडाळात मार्गदर्शन
जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर सोमवारी नारायण राणे सिंधुदुर्गात येत असून कुडाळ येथे ते समर्थकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे यावेळी राणे काय बोलणार याकडे जिल्हावासीयांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.