डीपीसाठी सूचना व हरकती २९ जुलैपर्यंत नोंदवा
By admin | Published: June 8, 2016 03:52 AM2016-06-08T03:52:11+5:302016-06-08T03:52:11+5:30
मुंबई महापालिकेने नागरिकांना विकास आराखड्यावर २९ जुलैपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्यावरून महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली असतानाच आता मुंबई महापालिकेने नागरिकांना विकास आराखड्यावर २९ जुलैपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या माहितीसाठी प्रारूप विकास आराखडा, विकास नियंत्रण नियमावली व अहवाल संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सूचना व हरकती संकेतस्थळाद्वारे अथवा पत्राद्वारे पाठविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४)’, ‘प्रारूप विकास नियंत्रण नियमावली (२०३४)’ आणि ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४) अहवाल’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भातील बाबी महापालिका मुख्यालयातदेखील माहितीसाठी सभागृह क्रमांक ३मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)