मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या हाती दिले रिपोर्ट कार्ड; चार वर्षांतील कामगिरीचा आढावा
By यदू जोशी | Published: October 10, 2018 03:39 AM2018-10-10T03:39:29+5:302018-10-10T03:40:26+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या.
भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. तीन तासांच्या बैठकीत सुरुवातीलाच प्रत्येक आमदाराच्या हातात दोन पाकिटे देण्यात आली. हिरव्या रंगाच्या पाकिटात राज्य सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीचे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती होती. दुसऱ्या खाकी पाकिटात काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली. आमदारांनी ते उघडताच त्यातील अहवाल बघून अनेक जण जमिनीवर आले त्यात मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागण्याची अपेक्षा असलेल्या काही जणांचा देखील समावेश होता. त्यांचे चेहरे पडले तर काहींचे फुलले
भाजपाच्या आमदारांबद्दल जनतेच्या भावना काय आहेत कोणत्या मतदारसंघात जनतेची पहिली पसंती आज कोणत्या पक्षाचा कोणता नेता आहे, कोणत्या मतदारसंघात आमदाराची लोकप्रियता कशी आणि किती आहे हे अहवालात नमूद होते. आजच्या परिस्थितीत मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपाच्या बाजूने आहेत, कोणते विरोधात जाऊ शकतात आमदारांबद्दल नेमकी नाराजी काय आहे आमदाराच्या कुठल्या कामांवर मतदार खुश आहेत, याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली आहे.
‘प्रत्येक जणाने अहवाल नीट वाचावा. अजूनही वर्षभराचा काळ हाती आहे. प्रत्येकाने आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोठा टप्पा गाठून आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनतेसमोर जायचे आहे’,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले.
खाजगी कंपनीकडून कामगिरीचे सर्वेक्षण
एका खाजगी कंपनीकडून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील १२२ भाजपा आमदारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करून घेतले आणि आज प्रत्येकाच्या हाती त्याबाबतचा अहवाल दिला. या अहवालात आपल्या मतदारसंघासंबंधी बारीक-सारीक तपशील तसेच जनतेचा कानोसा घेण्यात आला आहे हे वाचून आमदार आश्चर्यचकित झाले. प्रत्येक मतदारसंघातील पंचवीस ते तीस गावांमध्ये फिरून हे सर्वेक्षण करण्यात आले.