शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार
By admin | Published: December 20, 2015 12:32 AM2015-12-20T00:32:59+5:302015-12-20T00:32:59+5:30
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना आधी विरोधी पक्षात आणि आता सत्तेत असताना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदतीचे पॅकेज देऊन त्यांच्या
नाशिक/जळगाव : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना आधी विरोधी पक्षात आणि आता सत्तेत असताना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदतीचे पॅकेज देऊन त्यांच्या अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच अहवाल देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
शिवसेना कार्यालयात शनिवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १२२ कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजारांचे धनादेश देण्यात आले. तत्पूर्वी सकाळी शिवसेनेच्या डझनभर आमदारांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा एकनाथ शिंदे व राज्यमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला.
इगतपुरी तालुक्यात कृष्णा शिंदे या सेवानिवृत्त सैनिकाने नापिकीमुळे आत्महत्या केली. आयुष्यभर देशसेवा केलेल्या जवानावर अशी दुर्दैवी वेळ आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सेनेचे तीन मंत्री व आमदार, खासदार, महापौर दौरे करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खान्देशात दुष्काळ पाहणी
सेना आमदारांनी शनिवारी खान्देशातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरे रविवारी खान्देशात शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करणार आहेत. चमगाव (ता. धरणगाव) येथील जिजाबराव विठ्ठल सावंत (५३) या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची आ. संदीपान भुमरे यांनी भेट घेऊन, त्यांच्या वारसांना दहा हजारांचा धनादेश दिला. चार आमदारांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पाहणी केली.