दहावीच्या कलमापन चाचणीचा अहवाल आज
By admin | Published: April 25, 2016 05:52 AM2016-04-25T05:52:08+5:302016-04-25T05:52:08+5:30
सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे.
मुंबई : दहावीच्या मार्च २०१६ च्या परीक्षेस प्रथमच बसलेल्या सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे. हा अहवाल छापील स्वरूपात विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर वितरित केला जाणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडण्यासाठी मदत मिळावी, यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांचे निकाल दहावीच्या गुणपत्रिकेसोबत देण्याचा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी
जाहीर केलेला प्रकल्प सोमवारी पूर्णत्वास येत आहे. शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते. ही कलचाचणी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. या कल अहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम अथवा शाखा निवडीविषयी मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही बाबी यात असतील. विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून स्वत:स अनुरूप निर्णय घेता येईल. विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी महितीसाठी संकेतस्थळावरून विद्यार्थी व पालकांना माहिती घेता येईल.