एचडीआयएलप्रकरणी अहवाल द्या - मुख्यमंत्री
By admin | Published: July 21, 2016 03:15 AM2016-07-21T03:15:30+5:302016-07-21T03:15:30+5:30
एचडीआयएलने परवानग्यांचा वापर आर्थिक फायद्यासाठी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
विरार : येथे खाजगी मालकीची जमिन सरकारी दाखवून रेंटल हाऊसिंंगस्कीममध्ये शासनाची दिशाभूल करून एचडीआयएलने परवानग्यांचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेत.
विरार येथील ग्लोबल सिटीतील आराखड्यात तत्कालीन आयुक्त, नगररचना विभाग, सिडको प्राधिकरण आणि एचडीआयएल, एव्हरशाइन डेव्हलपर्स व त्यांचे आर्किटेक्ट यांनी केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी उघडकीस आणले होते. शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न बुधवारी केला होता. त्यावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी शासनाच्या वतीने लेखी उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवले. राज्य शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल वसई-विरार महानगरपालिका व नगररचना संचालनालयाकडून मागविला असून तो प्राप्त झाल्यानंतर त्यावर शासन पुढील कार्यवाही करील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेआहे.