‘इको सेन्सिटिव्ह’ गावांबाबत गुरुवारपर्यंत हरकती नोंदवा
By admin | Published: April 25, 2017 12:59 AM2017-04-25T00:59:07+5:302017-04-25T00:59:07+5:30
पालकमंत्र्यांचे आवाहन : पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक
कोल्हापूर : राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात परिसंवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सिटिव्ह झोन) समाविष्ट असलेल्या गावांसह त्यावर उपजीविका अवलंबून असलेल्या गावांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवार (दि. २७) पर्यंत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, वन्यजीव विभागीय वन्य अधिकारी सीताराम झुरे, वनविभागाचे पी. पी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील १८४ गावे डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार समाविष्ट आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनची प्रारूप अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जारी केली आहे. शेती व शेती संलग्न व्यवसायावर बहुतांश गावांची उपजीविका अवलंबून असल्याने अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेशासाठी विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवारपर्यंत हरकती सादर करणे आवश्यक असल्याने यथोचित कारणांसह वेळेत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राधानगरी या तालुक्याच्या ठिकाणासह अन्य महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व समावेशीत गावांचा फेर सर्व्हे करून जी गावे वगळणे आवश्यक आहे. ती गावे कोणत्या कारणांसाठी वगळावीत याबाबतची मागणी केंद्र सरकारकडे सादर करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.