‘सारथी’चा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:08 AM2018-05-04T06:08:47+5:302018-05-04T06:08:47+5:30

राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी मिळावी यावर भर देणारा

Report of 'Sarathi' to the Chief Minister | ‘सारथी’चा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

‘सारथी’चा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

googlenewsNext

मुंबई : राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी मिळावी यावर भर देणारा आणि या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना सुचविणारा अहवाल छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्गदर्शन समितीने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सारथीच्या स्थापनेची घोषणा केली होती. ख्यातनाम विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील ‘सारथी’च्या स्थापनेसंदर्भात पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन समितीचीही स्थापना करण्यात आली होती. सदानंद मोरे यांच्या समितीने गुरुवारी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. या वेळी मोरे, समिती सदस्य परिहार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
मोरे यांच्या अहवालात विविध शिष्यवृत्त्या, विद्यावेतन, स्पर्धा परीक्षा व करिअरविषयक मार्गदर्शन, साहित्य निर्मिती, कौशल्यविषयक संधी, यासह अनेक विकासविषयक योजना सुचविल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून कृषी, कृषीसंलग्न व्यवसाय व जलसंधारणविषयक संशोधन, प्रसार व प्रशिक्षण यासाठी समन्वयाचे काम होणार आहे. तसेच मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाजातील विविध घटकांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत.
सारथीच्या माध्यमातून किमान दोन वर्षांसाठी सहा विशेष प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचीही शिफारस समितीने केली आहे. संस्थेमार्फत सुचविलेल्या विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील आठ ठिकाणी प्रादेशिक कार्यालयांची स्थापना, सर्व तालुकास्तरावर दूत नेमण्याची शिफारस आहे. याशिवाय सारथी संस्थेची संरचना, कार्यपद्धती, कार्यक्रम-उपक्रमांबाबतही अहवालात सविस्तर सूचना केल्या आहेत. समितच्या शिफारशीनुसार सारथी ही संस्था ना नफा-ना तोटा या तत्त्वावर चालविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Web Title: Report of 'Sarathi' to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.