शाळांमधील लैंगिक शोषणाची तक्रार वेबसाईटवर करा
By admin | Published: March 31, 2017 01:38 AM2017-03-31T01:38:17+5:302017-03-31T01:38:17+5:30
विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता लैंगिक शोषणाची तक्रार लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाकडे द्यावी
मुंबई : विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता लैंगिक शोषणाची तक्रार लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाकडे द्यावी. त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट काढण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीवर तेथील एक शिक्षक फक्कड नारायण शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुभाष साबणे, आशिष शेलार, भारती लव्हेकर आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, शिंदे याला अटक करण्यात आली आणि त्याला निलंबित करण्यात आले. राज्यात घडणाऱ्या अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्याच आहेत. अशा घटनांबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी शासनाच्या वेबसाईटवर माहिती दिली तर त्यांचे नाव गुप्त ठेवून तत्काळ कारवाई केली जाईल.
उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय मुलामुलींचे समुपदेशन करून त्यांच्यावरील अत्याचारांबाबत त्यांना बोलते करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येत आहे, असे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादरकडून मुलींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे.
परंतु, संबंधित फादरविरु द्ध कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे फादरविरुद्ध कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले.