अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 02:22 AM2017-03-22T02:22:55+5:302017-03-22T02:22:55+5:30

सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आरोपींनी प्रश्नपत्रिकेच्या सीडीचा पासवर्ड कसा मिळवला, या प्रश्नाची उकल करण्यासाठी

Reported about 12 employees including the officials | अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले

अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले

Next

ठाणे : सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आरोपींनी प्रश्नपत्रिकेच्या सीडीचा पासवर्ड कसा मिळवला, या प्रश्नाची उकल करण्यासाठी गत आठ दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून असलेल्या ठाणे पोलिसांनी नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील ४ अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाऱ्यांचे जबाब आतापर्यंत नोंदविले आहेत.
सैन्य भरती मंडळातर्फे ४ पदांसाठी २६ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या २४ आरोपींना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपीकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगु, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. सैन्य भरती मंडळाच्या दिल्लीस्थित मुख्यालयाने प्रश्नपत्रिकेच्या सीडीचा पासवर्ड नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास दिला होता. हा अधिकारी संगणकावर पासवर्ड टाइप करीत असताना आपण दुरून पाहिले. त्यांच्या बोटांच्या हालचालीवरून पासवर्डचा अंदाज बांधला, अशी माहिती रवींद्रकुमारने तपास अधिकाऱ्यांना पोलीस कोठडीदरम्यान दिली होती. त्याच्या जबाबातील सत्यता तपासण्यासाठी पोलिसांनी प्रात्यक्षिक केले असता आरोपी पासवर्ड ओळखू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का, याची चाचपणी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचे पथक गत आठ दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहे. आरोपींचे जाळे नागपुरातच असून, येथील प्रत्येक मुद्द्यावर पथकाकडून सखोल तपास सुरू आहे.
सैन्य भरती मंडळाच्या दिल्ली कार्यालयाकडून प्रश्नपत्रिकेची सीडी नागपूर कार्यालयास प्राप्त झाल्यापासून प्रश्नपत्रिकेची छपाई होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास पोलीस अधिकारी तपासून पाहत आहेत. या सीडीचा संबंध ज्या-ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी येतो, त्या सर्वांचीच भूमिका पोलीस तपासत आहेत. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील १२ कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामध्ये ४ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वांचे जबाब तपासून त्यातील बारकावे शोधण्याचे काम सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Reported about 12 employees including the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.