भाज्यांची आवक कमी : सरव्यवस्थापकांकडे अहवाल रवाना
By admin | Published: July 5, 2016 04:29 PM2016-07-05T16:29:13+5:302016-07-05T17:16:01+5:30
कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशन व हमाल, माथाडी कामगार संघटनेने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदनंतर मंगळवारी बाजार समितीचे कामकाज पूर्ववत झाले.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशन व हमाल, माथाडी कामगार संघटनेने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदनंतर मंगळवारी बाजार समितीचे कामकाज पूर्ववत झाले.
फळ व भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी सर्व १२५ भाजी व फळ अडतदारांची दुकाने पहाटेच सुरू झाली. सहा वाजेपर्यंत सर्वच दुकाने उघडली. परंतु मंगळवारी भाज्यांची आवक कमी होती. भेंडी, मिरची यांची आवक कमी झाली. वांगी, गिलके, कारले, गोल भेंडी, मेथी यांची आवक मात्र बऱ्यापैकी होती. सर्व भाज्यांचे लिलाव नेहमीप्रमाणे झाले.
तर हमाल बांधवही कामावर आले. धान्य बाजारातील कामकाजही पूर्ववत सुरू झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
शासनाने दखल घ्यावी
शेतकऱ्यांचे नुकसान करावे, अशी फळ व भाजीपाला असोसिएशनची भूमिका नाही, परंतु अडतदारांचे नुकसान व्हायला नको, अनेक लोकांना बाजार समितीमध्ये रोजगार मिळाला त्यांचाही विचार करावा. आम्ही फक्त एकदिवसीय बंद पुकारला होता. पुढील भूमिका अजून निश्चित झालेली नाही, असे फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशनने म्हटले आहे.
अहवाल सरव्यवस्थापकांना पाठविला
बाजार समितीमध्ये सोमवारी पुकारलेल्या बंदचा अहवाल पणन मंडळाच्या सरव्यवस्थापकांनी मागितला होता. तो पाठविल्याची माहिती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली.