महाभारत खंडांचे होणार पुनर्मुद्रण

By admin | Published: March 21, 2016 12:46 AM2016-03-21T00:46:12+5:302016-03-21T00:46:12+5:30

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संपादित केलेली ‘महाभारत’ची संशोधित आवृत्ती इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी प्रमाण मानली जाते.

Reprint of Mahabharata volumes | महाभारत खंडांचे होणार पुनर्मुद्रण

महाभारत खंडांचे होणार पुनर्मुद्रण

Next

नम्रता फडणीस , पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संपादित केलेली ‘महाभारत’ची संशोधित आवृत्ती इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी प्रमाण मानली जाते. या आवृत्तीच्या १९ खंडांना अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मात्र, निधीअभावी त्याचे पुनर्मुद्रण करणे संस्थेला शक्य नव्हते. दानशूर व्यक्तींकडून महाभारताच्या पुनर्मुद्रणासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे या सर्व खंडांच्या पुनर्मुद्रणाचे काम संस्थेने हाती घेतले आहे.
अनेक प्रकाशित पोथ्या वाचून त्याची वर्गवारी करून संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीतून महाभारताचा पहिला खंड १९४१ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर दुसरा खंड १९४३ मध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही खंडांचे संपादन व्ही. एस. सुकथनकर यांनी केले होते. टप्प्याटप्प्याने अनेक नामवंत विद्वानांच्या सहभागातून महाभारताच्या १९ खंडांची निर्मिती झाली.
हा शेवटचा खंड श्रीपादकृष्ण बेलवलकर यांच्या संपादकीय मार्गदर्शनातून १९६६ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार श्रीमान महाभारतम (इंट्रोडक्टरी), आदीपर्व, सभापर्व, अरण्यकपर्व, वीरतापर्व, उद्योगपर्व, भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व, शल्यपर्व, सौपतिकापर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व, अनुशासनपर्व, अश्वमेधिकापर्व, आश्रमावासिकापर्व, मौसलापर्व, महाप्रस्थानिकापर्व आणि स्वर्गारोहणपर्व असे १९ खंड अभ्यासकांना उपलब्ध झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून संस्था, ग्रंथालय, अभ्यासक आणि संस्कृतीचा व्यासंग असलेल्या व्यक्तींकडून महाभारताच्या संशोधित आवृत्तीच्या या १९ खंडांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. प्राकृत डिक्शनरीच्या पाच आवृत्त्यांचे नव्या पद्धतीने पुनर्मुद्रण करण्याचीदेखील संस्थेची योजना असून, यासाठी आर्थिक पाठबळ मिळाले असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Reprint of Mahabharata volumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.