आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:13 AM2019-10-13T05:13:16+5:302019-10-13T05:13:28+5:30
उस्मानाबादेत धुमशान । मधुकर चव्हाण, राणा पाटील, तानाजी सावंतांनी थोपटले दंड
उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यावेळी उथळ पक्षांतर, बंडखोरीने चांगलाच खळखळाट निर्माण केला आहे़ उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसरा झेंडा हाती घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे़ या सगळ्या उलथापालथीत मतदारांचे लक्ष मात्र, तुळजापूर अन् परंडा मतदारसंघाकडे लागले आहे़ येथून तीन आजी-माजी मंत्री आखाड्यात आहेत़ यावेळची लढत ही तिघांसाठीही प्रतिष्ठेची आहे़ कोणत्याही स्थितीत प्रतिस्पर्ध्याची पाठ लावायचीच, या इर्ष्येने वेगवेगळे डाव टाकले जात आहेत़
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात रंगतदार लढत ही तुळजापुरात होत आहे़ येथे भाजपने माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यात कुस्ती लागली आहे़ पाचवेळा निवडून आलेल्या चव्हाणांसमोर यावेळी भाजपने राणा पाटील यांना उतरवून पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले आहे़ दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व प्रहारनेही तगडे उमेदवार दिल्याने रंगत वाढली आहे़ असे असले तरी राणा व मधुकररावांसाठी ही लढत टोकाच्या प्रतिष्ठेची आहे़
विधानपरिषदेची टर्म अजून बरीच शिल्लक असतानाही जनतेतून निवडून जाण्याचा चंग बांधलेल्या जलसंधारणमंत्री प्रा़तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात सेनेकडून शड्डू ठोकला आहे़ त्यांच्यापुढे हॅट्ट्रीक साधलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचे आव्हान आहे़ राष्ट्रवादीचा हा गड सर करण्यासाठी सावंतांनी जंग-जंग पछाडले आहे़ दरम्यान, या दोघांच्या भांडणात ‘वंचित’च्या सुरेश कांबळे यांनीही मतदारसंघात आपली ‘हवा’ तयार करण्यात यश मिळविले आहे़
उमरग्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार हॅट्ट्रीक साधण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत़ मात्र, त्यांच्यापुढे काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी आव्हान निर्माण केले आहे़ येथे वंचित बहुजन आघाडीही निर्णायक स्थितीत आहे़
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने कैलास पाटील या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे़ तर राष्ट्रवादीने संजय निंबाळकर यांच्या माध्यमातून सेनेला आव्हान दिले आहे़ या दोघांपुढे बंडखोर अजित पिंगळे, सुरेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे़ खा़ओमराजेंसाठी ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे़
प्रचारातील चर्चेचे मुद्दे
परंड्यापासून तुळजापूर व्हाया उस्मानाबाद, कृष्णेच्या पाण्याचा मुद्दाच प्रचारात अग्रस्थानी आहे़ मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी पुढच्या पाच वर्षात आपणच आणून दाखवू, अशी ग्वाही वरील तिन्ही मतदारसंघात सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत़
रोजगार हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहे़ जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने तरुणांना गाव सोडावे लागते़ त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय सर्वच उमेदवारांनी अजेंड्यावर घेतला आहे़ निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्याचे आश्वासन उमेदवार मतदारांना देत आहेत़
जिल्ह्यात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत़ त्यामुळे स्वाभाविकच प्रचारात हा घटक फ्रंटफुटवर असणाऱ त्यांच्यासाठी सिंचन सुविधा, शेतमालास भाव, कृषी प्रक्रिया उद्योग, पीकविमा, असे परंपरागत मुद्दे रेटले जात आहेत़