मराठवाड्यात पंकजा आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:59 AM2018-05-22T00:59:52+5:302018-05-22T00:59:52+5:30

विधान परिषद निवडणूक; सहा जागांचे गुरुवारी निकाल

Reputation of Pankaja and Dhananjay Munde in Marathwada | मराठवाड्यात पंकजा आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला

मराठवाड्यात पंकजा आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext


मुंबई : मराठवाड्यातील उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस व आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत होत आहे़ या लढतीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे़
बीड जिल्ह्यातील अपात्र ठरविण्यात आलेल्या ११ नगरसेवकांना निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी पात्र ठरविले आहे़ यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली़ सुनावणीअंती न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ती मते तूर्त ग्राह्य धरली जावू नयेत, असे निर्देश दिले आहेत़ दोन्ही उमेदवारांच्या मतातील अंतर ११ पेक्षा कमी होत असेल, तर त्यांची मते ग्राह्य धरायची किंवा नाही, याबाबत न्यायालयाकडून निर्देश मिळाल्यानंतरच कार्यवाही होईल़ मतमोजणी संपेपर्यंत निर्देश न आल्यास निकाल राखीव ठेवावा लागेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यांनी दिली़
परभणी-हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश देशमुख व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधापरिषद मतदारसंघासाठी १००५ पैकी १००४ मतदारांनी आपला हक्क बजावला़ बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील केंद्रावर एक मतदार अनुपस्थित राहिला़ लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या केंद्रावर एका मतदाराने मतपत्रिका उघडपणे दाखवून गोपनीयतेचा भंग केला आहे़

अमरावतीत १०० टक्के मतदान
अमरावती/चंद्रपूर : अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजतापर्यंत अनुक्रमे १०० आणि ९९.७२ टक्के मतदान झाले. यामध्ये सहा उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले.

चंद्रपूर-वर्धेत दावे-प्रतिदावे
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीमध्ये भाजपाचे रामदास आंबटकर आणि काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांच्यात मुख्य लढत असून जगदीश टावरी आणि सौरभ तिमांडे हे दोन अपक्षही रिंगणात आहेत. येथे भाजपाचे पारडे जड असले तरी काँग्रेसनेही विजयाचा दावा केला आहे.

अमरावतीत थेट सामना
अमरावती मतदारसंघात राज्यमंत्री भाजपाचे प्रवीण पोटे व काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात सरळ सामना आहे. या निवडणुकीसाठी ४८९ मतदार होते. मात्र, भातकुली येथील एका नगरसेविकेच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयाने जात वैधतेसंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांना न्यायालयीन निर्देशाने यादीत नाव असतानादेखील मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Reputation of Pankaja and Dhananjay Munde in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.