वाहतूक कोंडीतून सुटका
By admin | Published: September 1, 2014 02:12 AM2014-09-01T02:12:58+5:302014-09-01T02:12:58+5:30
ठाणे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची त्यातही रिक्षांची कोंडी जुन्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत होती.
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची त्यातही रिक्षांची कोंडी जुन्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत होती. या मार्गावर रेल्वे स्थानकातून तसेच जांभळी नाक्यावरून येणारी आणि पुन्हा रेल्वे स्थानकातून जांभळी नाका आणि गावदेवीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होत होती. आता येथे वाहतूक नियंत्रण शाखेने रोटरी फ्री वे पॅटर्न राबविल्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडीही दूर झाली असून, थेट ठाणे स्थानक गाठणे शक्य होणार आहे.
नव्यानेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रश्मी करंदीकर यांनी शहरातील वाहतुकीचा आढावा घेतला होता. ठाणे शहरातील गोखले रोड, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक हे तिन्ही मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मार्गावर एकत्र आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे यायला आणि बाहेर पडायला मोठा अडथळा निर्माण होत होता. यातून या मार्गावरील काही ठिकाणचे मार्ग बंद करून तो रोटरी फ्री वे पद्धतीने सुरू ठेवण्याची सूचना त्यांनी ठाणे नगर वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांना केली.