भीमाशंकरला पर्यटकांची सुटका
By Admin | Published: August 6, 2016 12:49 AM2016-08-06T00:49:56+5:302016-08-06T00:49:56+5:30
स्वराज्य ट्रेकिंगचे सदस्य नरेंद्र मुऱ्हे व त्यांच्या सहकारी तरुणांनी बुधवारी भीमाशंकर येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ४० लोकांना सुखरूप बाहेर काढले.
शिरगाव : सोमाटणे येथील स्वराज्य ट्रेकिंगचे सदस्य नरेंद्र मुऱ्हे व त्यांच्या सहकारी तरुणांनी बुधवारी भीमाशंकर येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ४० लोकांना सुखरूप बाहेर काढले.
नरेंद्र मुऱ्हे आणि सहकारी भीमाशंकरला ट्रेकिंगसाठी (पदभ्रमण) गेले होते. भोरगिरीपर्यंत वाहनाने जाऊन तेथून भीमाशंकरकडे पदभ्रमण करीत जाण्याचे त्यांचे नियोजन होते. रोप, हार्नेस, कॅरिमॅट, स्लिंग आदी साहित्य त्यांनी सोबत घेतले होते. वाटेत भीमा नदीच्या उगमस्थानाकडे जात असताना बरेच पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. कोणतीही खबरदारी न घेता सर्व जण पाण्यात उतरत होते. पलीकडे जाताना पाणी गुडघ्यापर्यंत असल्याने त्याचा धोका कोणालाही जाणवला नाही. परंतु, परत येताना जोरदार पाऊस झाल्याने पाणी वाढले. नदीने उग्ररूप धारण केल्याने पलीकडे गेलेले पर्यटक अडकून पडले. लहान मुले, महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिला, वयस्कर व्यक्ती यांचा समावेश होता. त्यांना मदतीसाठी लोकांनी
बरेच प्रयत्न केले. पण, पाण्यापुढे सर्व फोल ठरले. शेवटी पाण्यात नरेंद्र मुऱ्हे
आणि गोरख मुऱ्हे उडी मारून पलीकडे
पोहत जाऊन झाडाला वायर रोप बांधले आणि त्याला धरून एक एक पर्यटकाला सुखरूप अलीकडे आणले. प्रशांत मुऱ्हे, प्रजोत साठे, नीलेश मुऱ्हे यांनी त्यांना मदत केली. सर्व पर्यटकांनी त्यांचे आभार मानले. (वार्ताहर)
>नरेंद्र मुऱ्हे म्हणाले, की कधी आपला जीवही दुसऱ्याच्या कामी यावा आणि यामुळेच आम्ही या पर्यटकांची मदत करू शकलो.