फळमाशी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठात संशोधन
By admin | Published: February 15, 2015 10:26 PM2015-02-15T22:26:57+5:302015-02-15T23:39:32+5:30
गुणात्मक निर्बंध कायम : परदेशातील बंधने उठली; तरीही हापूसची वाटचाल बिकटच
रत्नागिरी : युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, यावर्षी बंदी उठवली तरी गुणात्मक निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीमुळे आलेल्या निर्बंधावर पर्याय म्हणून आंब्यावर उष्णजल प्रक्रियेसंबंधी कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. अरब राष्ट्रांसाठी निर्यातीकरिता किचकट प्रणाली नाही. मात्र, अमेरिकेसाठी किरणोत्सार, तर जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंटचा अवलंब केला जातो. युरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत गतवर्षी आंबा नाकारला होता. यावर्षी निर्यातबंदी उठवली तरी, फळमाशीविरहीत आंब्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उष्णजलप्रक्रिया योग्य असल्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. मात्र, हापूसवर संबंधित प्रक्रिया केल्यानंतर त्याचा दर्जा व अन्य गुणधर्म टिकून राहतील का ? याबाबत विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळी मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापूरी, केशर सारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादूर्भाव होतो. परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे.विद्यापीठाने पेरू आणून पेरू पिकवण्यासाठी ठेवले आहेत. पेरू अति पिकून सडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर त्यामध्ये अळयाची निर्मिती होते. सध्या, आंबा किरकोळ स्वरूपात आहे. मार्चपासून जिल्हाभरातून आंबा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंब्यावर फळमाशीचा होणारा परिणाम त्यासाठी आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया व त्याचे परिणाम याबाबत कोकण कृषी विद्यापिठातर्फे संशोधन सुरू करण्यात आले आहे. याबाबत योग्य निष्कर्ष प्राप्त झालेनंतरच अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघणार आहे. (प्रतिनिधी)
हापूसने गेल्या काही वर्षांत केवळ देशातीलच नव्हे; तर परदेशातील बाजारपेठेतही आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. असे असताना दुसरीकडे विविध अटींमुळे युरोपीयन देशांकडून हापूस नाकारला जात आहे. गेल्यावर्षी युरोपीयन देशांनी हापूस घेण्यास नकार दिल्याने हापूसच्या परदेशवारीवर संकट आले होते. फळमाशीचे कारण देत हापूस नाकारण्यात आला होता. पर्याय म्हणून आंब्यावर उष्णजल प्रक्रियेसंबंधी कोकण कृषी विद्यापीठात संशोधन केले जात आहे. त्याला यश आल्यास फळमाशीची समस्या कायम मिटू शकेल.
४२ लाख रूपयांमधून करणार विविध विकास कामे.
अमेरिकेसाठी हापूस पाठवताना करावा लागतो किरणोत्सार; तर जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंटचा अवलंब.
युरोपीय देशांनी गतवर्षी फळमाशीचे कारण देत नाकारला होता हापूस.
निर्यातबंदी उठवली तरी फळमाशीविरहीत आंब्यासाठीचे निर्बंध जारीच.
उष्णजलप्रक्रियेचा पर्याय योग्य ?