जैन आगमांवरील संशोधन दिशादर्शक
By Admin | Published: May 9, 2016 03:44 AM2016-05-09T03:44:46+5:302016-05-09T03:44:46+5:30
‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती
मुंबई : ‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती घेतलेला उपक्रम मानवजातीला दिशादर्शक ठरेल, असे सांगत हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे, अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
‘भगवती सूत्र’ या प्राचीन आगमासंदर्भात ‘जैन तत्त्वज्ञान आणि विज्ञान’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत रविवारी दादर येथील योगी हॉलमध्ये झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुनी नम्रमुनी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, जैन विश्वभारतीचे अशोक कोठारी या मान्यवरांच्या उपस्थितीत भगवती सूत्र या पुरातन ग्रंथाच्या पाचव्या खंडाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्यात आला.
विद्यासागर राव म्हणाले, पारंपरिक शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण यांची सांगड घालण्याची गरज आहे. असे केल्यास त्यातून चारित्र्य संपन्न समाज निर्माण होईल. महात्मा गांधींवर अहिंसा, अनेकांत व अपरिग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा होता याचा उल्लेख करून गांधीजींनी भगवान महावीरांची शिकवण राजकीय व सामाजिक स्तरावर आचरणात आणली.
जैन आगम संशोधन प्रकल्प सुरू केल्याबद्दल राज्यपालांनी दिवंगत आचार्य तुलसी व आचार्य महाप्रज्ञ, सध्याचे आचार्य महाश्रमण तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक मुनी महेंद्रकुमार यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जैन समाजातील युवकांनी हुंडा व व्यसनमुक्ती या अनिष्ट प्रथांविरुद्ध तसेच पर्यावरण संरक्षण यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)