अकोल्यात ‘आई’च्या दुधावर संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:19 AM2018-11-27T06:19:34+5:302018-11-27T06:19:49+5:30
‘आयसीएमआर’चा प्रकल्प : बाराव्या महिन्यांपर्यंत माता-बालकांचा करणार अभ्यास
- प्रवीण खेते
अकोला : इंडियन काउन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आई’च्या दुधावर संशोधनाला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आईच्या दुधाचे प्रमाण व गुणवत्ता तपासली जाणार असून, बाळाला सहा महिने निव्वळ स्तनपान करणे का आवश्यक आहे, याचेही ठोस पुरावे मिळणार आहेत.
‘माता व बाल पोषण’ असे या संशोधनाचे नाव आहे. यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेतर्फे अकोला ‘जीएमसी’ला अनुदान प्राप्त झाले. या तीन वर्षात संशोधकांनी शंभर माता-बालकांचा अभ्यास करण्याचे ध्येय ठेवले असून, त्यापैकी ५० माता-बालकांवरील अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. बाळाच्या जन्मापासून पहिल्या महिन्यानंतर बाराव्या महिन्यापर्यंत माता-बालकांचा अभ्यास करण्यात येत आहे. संशोधनात मातांना दिले जाणारे जड पाणी भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरच्या थल अमोनिया विस्तार प्लान्ट, परमाणू ऊर्जा विभाग येथून प्राप्त केले आहे.
भारतात पहिल्यांदाच संशोधन
मातेच्या आहारासोबतच दुधातील तत्त्वांचा अभ्यास केला जात आहे. पहिल्या तीन महिन्यानंतर मातेला जड पाणी प्यायला दिले जाते. स्तनपानानंतर बाळाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी बेंगळुरू येथील ‘सेंट जॉन्स रिसर्च इन्टिट्युट’ येथे पाठवून बाळाच्या वाढीसंदर्भात अभ्यास केला जातो. अशा प्रकारे वर्षभर माता-बालकांच्या आहार व आरोग्याची तपासणी केली जात असून, या या पद्धतीने भारतात प्रथमच संशोधन होत आहे.