साथीच्या आजाराने रहिवासी त्रस्त
By admin | Published: April 3, 2017 03:02 AM2017-04-03T03:02:49+5:302017-04-03T03:02:49+5:30
शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे
मुंबई : शहरातील नाल्यांची वर्षांतून किमान दोन वेळा सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करत असल्याने, मुंबईत अनेक ठिकाणी नाले पूर्णपणे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चेंबूरचा चरई नालादेखील अशाच प्रकारे घाणीने पूर्णपणे तुंबला आहे. परिणामी, नाल्यातील या घाणीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात साथीच्या आजारानेदेखील थैमान घातल्याने, रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
चेंबूरच्या तीन तलवापासून सुरू होणारा हा नाला साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून पुढे खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी दुर्गंधी असते. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच इथे नाले सफाई करत असल्याने, सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने तुंबला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या इथे साथीचे आजार पसरले आहेत. याशिवाय नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असल्याने, अनेक रहिवाशांची घरे ही नाल्यासमोरच आहेत. त्यामुळे नाल्यातील घाण घरात पसरत आहे, असे रहिवासी मनोहर वाघमारे यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून रहिवाशांना या घाणीचा मनस्ताप होत आहे. या प्रकरणी रहिवाशांनी येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाकडे अनेकदा तक्रारी दिल्या आहेत.
मात्र, नगरसेवक आपल्या या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तसेच पालिकेकडेही रहिवाशांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेकदा संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)