शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी नाराजी; राज्यभरात नेते-कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:55 AM2022-02-19T07:55:43+5:302022-02-19T07:56:23+5:30

शिवसेना-राष्ट्रवादीत राज्यभर तणातणी; ठाण्यात शिंदे विरुद्ध आव्हाड; रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना, बोदवड नगरपालिकेत खडसेंना दूर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप एकत्र

Resentment in Shiv Sena-NCP; Disagreement among leaders and activists across the state exposed | शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी नाराजी; राज्यभरात नेते-कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव उघड

शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी नाराजी; राज्यभरात नेते-कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव उघड

googlenewsNext

यदु जोशी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध अधिक दृढ असल्याचे आणि हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्याचे चित्र असताना, प्रत्यक्षात मात्र दोन पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये विविध ठिकाणी बेबनाव असल्याचे दिसत आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये अधिक जवळीक बघायला मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्लामसलतीतून सरकारचे निर्णय होतात असेही अनेकदा बोलले गेले. अलीकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी दोन पक्षांची आघाडी होती. काँग्रेस मात्र स्वबळावर लढली होती. असे असले तरी दोन्ही पक्षांमध्ये जिल्ह्याजिल्ह्यांत खटके उडत असल्याचे दिसत आहे.

विशेषत: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आमच्या जिल्ह्यातील नेत्यांना बळ देतात, त्या माध्यमातून शिवसेनेला दाबण्याचे काम केले जाते, असे राज्यातील किमान अर्धा डझन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे गाऱ्हाणे आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ट्विट करून बीड जिल्ह्यातील नगरपंचायत अध्यक्षपद निवडणुकीवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला हरविण्यासाठी शिवसेनेचे नेते भाजपची मदत घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेला ९, राष्ट्रवादीला ७ आणि भाजपला एक जागा मिळाली होती. तिथे शुक्रवारी  नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने भाजप नगरसेवकांची मदत घेतली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील व आमदार गिरीश महाजन यांनी शह दिला आणि राष्ट्रवादीच्या चमत्काराच्या दाव्यातील हवा काढली. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. लंके यांनी बाजी मारली. अहमदनगर शहरातही महापालिकेतील सत्तारूढ शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप असा सुप्त संघर्ष बघायला मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अकोला विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना राष्ट्रवादीने साथ दिली नाही, अशी तक्रार होती.

ठाणे महापालिका निवडणूक लवकरच होऊ घातली असताना नगरविकास मंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात खासदार सुनील तटकरे, त्यांच्या कन्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरुद्ध शिवसेना एकवटली आहे. आदिती यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. 

दोन भावांमध्ये कधी-कधी वाद होतात तसे राष्ट्रवादी-शिवसेनेचे कुठे थोडे-बहुत रुसवेफुगवे होत असतात. त्यात गंभीर असे काहीही नाही. घरातील वाद आहेत, घरातच मिटतील. चिंता करण्यासारखे काहीही नाही. - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते

Web Title: Resentment in Shiv Sena-NCP; Disagreement among leaders and activists across the state exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.