आरक्षण नामंजूर, मराठा नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:37 AM2018-12-01T01:37:41+5:302018-12-01T01:37:50+5:30

आंदोलनाची उपसणार तलवार  : जल्लोश फक्त भाजपचाच! 

Reservation disapproved, Maratha angry! | आरक्षण नामंजूर, मराठा नाराज!

आरक्षण नामंजूर, मराठा नाराज!

Next

-  गणेश देशमुख

अमरावती - मराठ्यांना देण्यात आलेले आरक्षण ही मराठ्यांची फसगत असून, हे आरक्षण आम्हाला नामंजूर आहे, असा सूर सकल मराठ्यांमधून उमटला आहे. आरक्षणासाठी उगारलेली आंदोलनाची तलवार म्यान केली जाणार नाही, असा निर्धारही सकल मराठ्यांनी व्यक्त केला.  


गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आरक्षण विधेयक पारित केल्यानंतर हायकमांडच्या आदेशावरून भाजपजन गावोगावी, तालुका आणि जिल्हा मुख्यालयी जल्लोषाचा ‘इव्हेन्ट’ आयोजित करीत सुटले आहेत. मराठ्यांमध्ये मात्र त्याच ताकदीने निषेध व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्याचे  भाजपकडून केले जाणारे मार्केटिंग मराठ्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळेच मराठा मंडळींनी व्हॉट्सअ‍ॅपच्या असंख्य ग्रुपवरून  शासनाच्या या फसव्या आरक्षणावर हल्ला चढविला आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठ्यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी मंथन करण्यात आले. अद्याप निश्चित नीती जाहीर करण्यात आली नसली तरी आंदोलनात्मक पवित्रा कायम ठेवायचाच, हा निर्धार मात्र सर्वांनी एकमताने केला. विदर्भात मराठ्यांचा खासा प्रभाव असलेल्या अमरावती जिल्ह्यात या आरक्षण घोषणेनंतर निषेधाचे सूर सर्वत्र उमटत आहेत. मूक मोर्चासाठी १५ लक्ष मराठा एकत्र आणण्याची क्षमता सिद्ध केलेल्या अमरावती जिल्ह्यात कुण्याही मराठा संघटनेने जल्लोष साजरा केला नाही. राज्यातील मराठा आंदोलनासंबंधीची नीती ठरविणाºयांमध्ये अमरावतीतील मराठ्यांचा सक्रिय सहभाग होता, हे येथे उल्लेखनीय.    


मराठ्यांच्या नाराजीचे कारण काय? 
शासनाने आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत पारित केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आरक्षण खरोखरीच द्यावयाचे असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा कायदा पारित करावा लागेल. त्यासाठी विशेष दुरुस्ती करून राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या आरक्षणाचा समावेश व्हावा लागेल, तरच मराठ्यांना संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासारख्या नोकºयांमध्ये आरक्षण मिळेल. आताच्या आरक्षणातून हा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा समुदायालाही या आरक्षणाचा लाभ नाही. राज्याबाहेर निष्प्रभ असे हे आरक्षण न्यायालयात टिकणारेदेखील नाही. तामिळनाडू राज्याने केंद्रातून मंजूर करवून घेतलेल्या आरक्षणाची मागणी मराठ्यांनी केली होती. राज्य शासनाने मात्र शब्द पाळला नाही, अशी भावना मराठ्यांची आहे. 

 


निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपने खेळलेली ही खेळी आहे. काँग्रेसलाही आरक्षण द्यावयाचे नव्हते, भाजपलाही ते द्यावयाचे नाही. मराठा आता जागरूक आहे. संसदेतून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठ्यांचा लढा थांबणार नाही. 
- सकल मराठा

Web Title: Reservation disapproved, Maratha angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.