घटनादुरुस्ती केली, तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी वेधले कायदेशीर बाबींकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:49 AM2021-06-17T08:49:19+5:302021-06-17T08:50:13+5:30
मुंबईतील आजच्या चर्चेनंतर ठरणार आंदोलनाची पुढील दिशा. मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या आंदोलनात संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात, याचीच उत्सुकता जास्त होती; पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.
सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आवताण दिले आहे, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे खा. संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत.
कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये २१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आजच्या चर्चेत आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
आजारी असतानाही धैर्यशील माने आंदोलनात
आजारी असतानाही सलाइनच्या पिनसह आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशील माने यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. कोरोनातून बरे झाल्यानंतर इन्फेक्शन झाल्याने सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मी माझी भूमिका पुण्यात मांडेन
- चंद्रकांत पाटील
n गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले. शाहू महाराजांच्या समाधिस्थळी आल्याआल्या पाटील यांनी संभाजीराजे यांना आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.
n यावेळी पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडायची आहे ती मी पुण्याचा लोकप्रतिनिधी असल्याने पुण्यात मांडणार आहे. या ठिकाणी मी मराठा समाजातील एक नागरिक म्हणून आलो आहे.
लाँगमार्च काढावा लागू नये
या चर्चेतून काही साध्य झाले नाही, तर आम्ही यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुणे ते मुंबई असा लाँगमार्च काढला जाईल. हा लाँगमार्च आम्हाला काढावा लागू नये, याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा. - खासदार संभाजीराजे
राज्यभरातून सहभाग
राजेंद्र कोंढरे (पुणे), करण गायकर, गणेश कदम (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), विनोद साबळे (रायगड), रघुनाथ चित्रे पाटील, धनंजय जाधव (पुणे), रमेश केरे, अप्पासाहेब कुडेकर (औरंगाबाद), महेश गवळी, सज्जनराव साळुंके, जीवनराजे इंगळे (उस्मानाबाद), नीलेश देशमुख (बुलडाणा), महादेव देवसरकर (नांदेड), गंगाधर काळकुटे, पूजा मोरे (बीड), वीरेंद्र पवार (मुंबई), माऊली पवार (सोलापूर), रमेश आंब्रे, प्रवीण पिसाळ (ठाणे), व्यंकट शिंदे (लातूर), ॲड. सुहास सावंत (सिंधुदुर्ग), संजय पाटील, नितीन शिंदे (सांगली), विवेकानंद बाबर, रफिक शेख (सातारा) आदी समन्वयक सहभागी झाले.