अल्पसंख्याकांना लवकरच आरक्षण
By admin | Published: June 12, 2014 03:02 AM2014-06-12T03:02:39+5:302014-06-12T03:02:39+5:30
राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असून लवकरच या बाबतची खूशखबर दिली
मुंबई : राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असून लवकरच या बाबतची खूशखबर दिली जाईल, असे अल्पसंख्य विकास राज्यमंत्री फौजिया खान यांनी बुधवारी विधानसभेत साांगितले.
अमिन पटेल, मधू चव्हाण, अस्लम शेख आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचा विकास भागभांडवल निधी २६८ कोटी रुपये असून टप्प्याटप्प्याने ही रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. नागरी आणि ग्रामीण भागात मुस्लिमबहुल वस्त्यांच्या विकासासाठी असलेली सध्याची आर्थिक तरतूद लवकरच वाढविली जाईल.
इस्माईल युसुफ कॅम्पसमध्ये सुधारणा करण्यासाठी ठोस प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल, असे फौजिया खान यांनी सांगितले. इस्माईल युसुफ कॅम्पस संस्थेच्या ट्रस्टींना विश्वासात घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)