आरक्षण हे सरकारचे नव्हे; मराठा आंदोलनाचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:22 AM2018-12-05T05:22:06+5:302018-12-05T05:22:19+5:30
मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत.
यवतमाळ/ अमरावती : मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत. मात्र, सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचेच हे सर्व यश आहे. आघाडी शासनाने दिलेले आरक्षण कोर्टात अडकल्यानंतर युती शासनाने चार वर्ष काय केले? मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले, ४० जणांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामुळे अखेर युती शासनाला आरक्षणाचा निर्णय घेणे भाग पडले. हाच निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला असता तर ४० जीव वाचले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
काँग्रेसच्या पश्चिम विदर्भातील जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ मंगळवारी यवतमाळातून झाला. या वेळी पोस्टल ग्राउंडवरील जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय झाला; पण भाजपा-शिवसेना सरकारने धनगर आरक्षणाचे काय केले? पोहरादेवीत बंजारा समाजासाठी १०० कोटी दिले म्हणून मुख्यमंत्री सांगतात आणि दोनच दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबाकडून ५०० कोटी काढून घेतात. हे देणारे सरकार नव्हेतर देवाचेही पैसे काढून घेणारे सरकार आहे.
२०१४ पासून शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. विदर्भाचे प्रश्न आपण सोडवू शकत नाही, हे लपविण्यासाठीच नागपूरचे अधिवेशन बंद करून मुंबईला पळविले, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.
>‘दर्डा यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला’
यवतमाळ जिल्ह्याने एके काळी राज्याला नेतृत्व दिले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन समर्थ मुख्यमंत्री दिले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा हे उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला. राज्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी त्यांनी धडपड केली, पण सध्याच्या भाजपा-सेना सरकारने ‘कुठे नेऊन ठेवले यवतमाळ माझे’ म्हणण्याची वेळ आणली आहे, असेही खा. अशोक चव्हाण म्हणाले.