जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आरक्षण
By admin | Published: May 10, 2015 02:57 AM2015-05-10T02:57:15+5:302015-05-10T02:57:15+5:30
केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई : केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना सूचना दिल्या असून, मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे दोन टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय एचआरडीने घेतला आहे. एचआरडीने याबाबतच्या सूचना यूजीसीला दिल्या आहेत. यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी यामध्ये लक्ष घालून या निर्णयाचे पालन करावे, असेही यूजीसीने म्हटले आहे.
यूजीसीच्या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यायांमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी २ टक्के राखीव जागा ठेवाव्या लागणार आहेत. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राच्या वतीने काढण्यात आले आहे. या परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने महाविद्यालयांना २ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, महाविद्यालयांनी याची अंमलबजावणी करावी, असेही कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)