लॉटरीत महिलांना आरक्षण
By admin | Published: November 15, 2015 02:07 AM2015-11-15T02:07:57+5:302015-11-15T02:07:57+5:30
राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राज्यात एक लाख नवीन परमिटवाटपाचा कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेण्यात आला आहे.
ठाणे : राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राज्यात एक लाख नवीन परमिटवाटपाचा कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेण्यात आला आहे. यंदा यातून शैक्षणिक अटीला पूर्णविराम देऊन महिलांना ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुरुषांच्या जोडीने महिला रिक्षाचालकांची संख्याही वाढणार आहे. या संधीचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
तब्बल १६ वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये वितरीत झालेल्या रिक्षा परमिटवाटप कार्यक्रमात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बनावटगिरीला आळा घालण्यासाठी परमिटवर होलोग्राम लावून त्यात पारदर्शकता आणली. तसेच ते वाटप करताना परमिटधारकांच्या वारसदारांची माहिती घेण्यासाठी विशेष सिस्टीमही तयार केली आहे. त्याचबरोबर गाडीत परमिटची रंगीत प्रत ठेवण्यास सांगितले. ठाणे शहरात जुने २७ हजार परमिट असून २०१४ मध्ये ३ हजार ७४७ नव्या परमिटची भर पडली आहे.
ते देताना शासकीय अटीनुसार यंदा शैक्षणिक अटीला पूर्णविराम देऊन उर्वरित अटीतील गुन्हेगारी रेकॉर्ड, अर्जदार शासकीय नोकरदार आहे का, तो १५ वर्षांपासून
ठाण्यात वास्तव्य करतो
का, त्याच्याकडील वाहन परवान्यासह बॅज आदी बाबींची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओने दिली. (प्रतिनिधी)
येत्या २३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान नवीन रिक्षा परमिटचे लॉटरी पद्धतीने वितरण होणार आहे. या वेळी शैक्षणिक अट रद्द केली आहे. त्याचबरोबरीने या लॉटरी पद्धतीत महिलांना ५ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे महिलांनी सहभागी व्हावे.
- विकास पांडकर, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी