आरक्षण बंद करणार नाही

By Admin | Published: October 12, 2015 05:41 AM2015-10-12T05:41:22+5:302015-10-12T05:41:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.

Reservations will not be closed | आरक्षण बंद करणार नाही

आरक्षण बंद करणार नाही

googlenewsNext

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. बिहार विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरल्याने मोदी यांचे वक्तव्य याचसंदर्भात असल्याचे मानले जात आहे.
दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आणि दहिसर ते डी.एन. नगर व दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मार्गावरील मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी जेएनपीटी येथील पोर्ट उभारणीच्या कामाचा प्रारंभही त्यांनी केला. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार, सामाजिक न्याय मंत्री विजय सांपला तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, खा. रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.
वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक आमच्या हातून होणे, हे भाग्यलिखित असावे. आमच्या अगोदरही सरकार होते. पण त्यांना जी गोष्ट जमली नाही ती आम्ही अवघ्या काही दिवसात करून दाखवली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गंगवार यांनी तातडीने इंदू मिलची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे शक्य झाले. या जगावर जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार यात शंका नाही.
आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना व आताही दलित, उपेक्षितांना मिळणारे आरक्षण बंद होणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. तशा टोळ््याही कार्यरत आहेत. वास्तविक, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता इंदू मिलची जमीन तातडीने देऊन, संसदेत डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र बसवून भाजपानेच बाबासाहेबांबद्दलच्या निष्ठांचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच दलित, इतर मागासवर्गीय, आदिवासी यांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आदी राज्यांमध्ये या घडीला भाजपाची सत्ता आहे. डॉ. आंबेडकर यांनी दिलेली आरक्षणाची ताकद कोणीही रोखू शकत नाही. आपण स्वत: गरीबी पाहिली असून डॉ. आंबेडकर नसते तर माझ्यासारखा सामान्य घरातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचू शकला नसता.
डॉ. आंबेडकर यांना आपण दूरदृष्टीच्या अभावी केवळ दलितांचे नेते बनवले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, अशा शब्दात मोदींनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे विश्वातील दलित, शोषित, पिडीतांचे नेते आहेत. शोषितांच्या संघर्षाचा विषय निघाला की, मार्टीन ल्युथर किंग यांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांचे नाव जगभर घेतले गेले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षेचे विष पचवले. मात्र जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कधीच कुटुतेचे दर्शन घडवले नाही. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदींनी दिली.(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Reservations will not be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.