बसचे आसन आरक्षित केले; पण..

By प्रगती पाटील | Updated: January 21, 2025 08:52 IST2025-01-21T08:51:56+5:302025-01-21T08:52:17+5:30

Bus Reservation: आपण आसन आरक्षण केलेले असल्याने ते रिकामे असणार आहे का? त्यावर कोणालाच बसू देणार नसतील तर ठीक आहे, पण अगोदरच बसून आलेला प्रवासी न उठला तर काय करावे?  

Reserved a bus seat; but.. | बसचे आसन आरक्षित केले; पण..

बसचे आसन आरक्षित केले; पण..

- प्रगती जाधव-पाटील 
(उपसंपादक, लोकमत, सातारा)
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी आरक्षण केले असताना मधूनच प्रवास करावा लागला तर काय करावे? - शुभांगी गव्हाणे, सातारा 
नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी अनेकदा मोठ्या शहरात जावे लागते. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास ऐनवेळी जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवास आरामदायी होत नाही. साहजिकच चिडचिड होते. मानसिक, शारीरिक त्रास होतो तो वेगळाच. असे अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून अनेक नोकरदार, व्यापारी एसटीचे आगाऊ आरक्षण करत असतात. आपला शारीरिक, मानसिक त्रास कमी व्हावा हाच हेतू त्यामागे असतो. 
अशा लांब पल्ल्यासाठी नियोजित दिवसाचे आरक्षण केलेले असते. पण अचानक काही कारणाने आपल्याला आदल्या दिवशी पुढील गावात जावे लागले तर तेथील काम आटोपून आपण आपली नियोजित गाडी पकडून पुढील प्रवासाला जाऊ या, असे काहींना वाटणे साहजिकच आहे. पण त्याचवेळी एक प्रश्न सतावतो, आपण आसन आरक्षण केलेले असल्याने ते रिकामे असणार आहे का? त्यावर कोणालाच बसू देणार नसतील तर ठीक आहे, पण अगोदरच बसून आलेला प्रवासी न उठला तर काय करावे?  
याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या साताऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड म्हणाल्या, ‘एसटीच्या कोणत्याही गाडीचे आरक्षण केलेले असल्यास ते प्रवास सुरू होईपर्यंतच लागू असते. एसटी बसस्थानकातून पुढील प्रवासाला निघेपर्यंत संबंधित प्रवासी न आल्यास आरक्षण आपोआप रद्द होते. त्यामुळे निम्म्यातून प्रवास करण्याचा प्रश्नच येत नाही. अशावेळी किमान एक तास अगोदर हे आरक्षण रद्द करावे. त्या बदल्यात तिकिटाची ठरावीक रक्कम मिळेल. त्यानंतर नवीन आरक्षण करावे. 
( सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

Web Title: Reserved a bus seat; but..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.